संग्रहित फोटो
पुणे : लाडकी बहीण योजनेच्या लाटेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीला मोठं बहुमत मिळालं. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने या पराभवाची गंभीर दखल घेतली असून नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपादवरून उचलबांगडी केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभारही स्वीकारला अशातचं आता काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने राजिनामा दिल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या राजीनामा पत्रात रोहन सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, सरचिटणीस पदावर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला प्रमाण मानून आजपर्यंत मी काम केले आहे. कुठल्याही गटातटाच्या भानगडीत न पडता माझ्या खांद्यावर पक्षाची जी जबाबदारी आहे ती लक्षात ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पक्षाचे नाव चांगल्या पद्धतीने कायम अधोरेखित होईल.
अश्या आशयानेच मी आजवर काम करत आलोय. पक्षकार्यात मी नेहमीच सक्रियपणे काम केले आहे. जनप्रश्नांवर अनेक आंदोलने केली युवक काँग्रेसच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभागी राहिलो. २०२१ सालच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सरचिटणीस पदावर निवडून आल्यानंतर संघटनेसाठी काम करत असताना या पदाला कायमच न्याय देण्याचे आणि पक्षाची गरिमा कायम राखण्यासाठी किंबहुना ती वृद्धिंगत करण्यासाठी मी सदैव कटिबध्द राहिलो आहे.
काँग्रेस हा एक विचार आहे. हा विचार आणि हा पक्ष आजही तळागाळातील आणि गावकुसातील सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय ते श्रीमंत अश्या सर्व स्तरातील लोकांना आपलासा वाटतो. मात्र, पक्ष संघटनेतील अनेक बाबी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पटत नाहीत. सध्या पक्ष अडचणीच्या काळातून जातोय तरीही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय याचा विचार पक्षनेतृत्वाने करावा अशी माझी अपेक्षा आहे, असे रोहन सुरवसे यांनी म्हटले आहे.
भोरच्या संग्राम थोपटेंचाही पक्षाला राजीनामा
संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. शिवाय ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी उद्या (20 एप्रिल ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व समर्थक उपस्थित राहणार असल्याची ही चर्चा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते.