संग्रहित फोटो
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार आणि सोलापूरच्या माढा तालुक्याती डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांच्यात झालेली बातचीत व्हिडीओत कैद झाली असून तोच व्हिडीओ सोशल मीडियावर पसरला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे त्या महिला पोलिस अधिकाऱ्याला खडी उत्खनन तात्काळ थांबवण्यास सांगत आहेत. आदेशांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करू असे ते धमकीच्या स्वरात बोलतानाही दिसले. यावरुन आता काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, असे लोंढे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात बेकायदेशीर मुरुम उपसा केला जात असता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अधिकारी गेले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. यावेळी अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी करत तुझी एवढी हिम्मत, तुझ्यावरच कारवाई करतो, अशी धमकी देऊन सुरु असलेली कारवाई थांबवा असे बजावले. बेकायदेशीर कामावर कारवाई होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्रीच जर त्याला संरक्षण देत असतील आणि कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावत असतील तर राज्यात कायद्याचे राज्य नाही हे सिद्ध होते.
अतुल लोंढे पुढे म्हणाले की, अजित पवार हे फार शिस्तप्रिय असल्याचा आव आणतात. अनेक वर्षांपासून ते मंत्री तसेच उपमुख्यमंत्री पदावर आहेत, अजित पवार ज्येष्ठ व अनुभवी मंत्री आहेत. एका महिला पोलीस अधिकाऱ्याला धमक्या देऊन बेकायदेशीर कामाला संरक्षणही देत आहेत हे अत्यंत गंभीर आहे. बेकायदेशीर कामांना असा राजाश्रय देणे अयोग्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही अतुल लोंढे म्हणाले.