Justice D Y Chandrachud: ‘संविधान हे जिवंत प्रक्रिया आहे’; जस्टिस डी. वाय. चंद्रचूड यांचे पुण्यात प्रतिपादन
जस्टिस डी . वाय चंद्रचूड म्हणाले, कायद्याने शिकवलेली महत्त्वाची सवय म्हणजे अनिश्चिततेसोबत जगणे आणि त्यात सहज राहणे. मतभेद हे लोकशाहीचे दुर्बलत्व नसून सामर्थ्य आहे. संविधान मतभेद संपवण्यासाठी नाही, तर त्यांच्यासोबत जगण्याची चौकट देण्यासाठी आहे. निर्णयातील नम्रता, भाषेची शिस्त आणि मानवी अनुभवांची व्यापकता यावर भाष्य करताना चंद्रचूड म्हणाले, प्रत्येक वाक्याचे परिणाम असतात, प्रत्येक विरामाला अर्थ असतो. काळानुसार मौनही बोलते.
पुस्तक लिहिण्यामागील भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, ” भाषणे कायद्याला न्यायालयाबाहेर येण्याची संधी देतात. निर्णय वाद मिटवतात, तर भाषणे विचारमंथन आणि संवादाला वाव देतात.संविधान हे भूतकाळ व वर्तमान, संस्था व नागरिक, सत्ता व सद्सद्विवेक यांमधील जिवंत संवाद आहे.कायद्यातील मौनांवर भाष्य केला. अनेक निर्णायक घटनांची सुरुवात दुर्लक्षित राहिलेल्या आवाजांकडे कान देण्याने होते.
भारतातील सामाजिक सुधारणांची परंपरा अधोरेखित करत त्यांनी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची आठवण करून दिली. समता आणि प्रतिष्ठेच्या संकल्पना संविधानात लिहिल्या जाण्यापूर्वीच संघर्षातून घडल्या होत्या, असे ते म्हणाले.
अपूर्ण राहिलेल्या घटनात्मक प्रश्नांवर बोलताना त्यांनी वैवाहिक बलात्कार अजूनही गुन्हा म्हणून मान्य नसल्याकडे लक्ष वेधले. “समाज बदलण्याची वेळ आली नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संविधान परिपूर्णतेचे आश्वासन देत नाही, पण भिन्न विचार असलेले लोकही एका सामायिक राजकीय प्रवासात सहभागी होऊ शकतील अशी प्रक्रिया देते.“लोकशाही मतभेदांमुळे कोसळत नाही; मतभेद दडपले गेले की ती कोसळते,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसोबतसंवादात्मक चर्चेने कार्यक्रमाची सांगता झाली.






