कोरेगाव : जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे भरावीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे यांसह इतर विविध मागण्यांसाठी कोरेगाव पंचायत समिती समोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. 14 डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची शिक्षकांचा बेमुदत संप सुरू केला. या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समिती समोर शिक्षक विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, लिपिक, सेवक इत्यादी सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी, यासाठी राज्यभर संप चालू आहे. नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी मोर्चा देखील काढण्यात आला. परंतु, तेथे ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे विविध संघटनांनी 14 डिसेंबरपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत जिल्हा पातळी तसेच तालुका पातळीवर निदर्शने करण्यात येत आहेत. तसेच तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी आदी अधिकारी यांना याबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात येत आहेत.
दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथील तहसीलदारांना देखील निवेदन देण्यात आले. पंचायत समिती कार्यालयासमोर प्रांत अधिकारी अभिजीत नाईक हे एका निवडणूक विषयक आढावा बैठकीसाठी आले असता त्यांना देखील निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे अत्यावश्यक कामकाज वगळता इतर कामकाज आपण नियोजित करू नये, अशी विनंती करण्यात आली. ती विनंती प्रांताधिकारी यांनी मान्य केली. यावेळी निलेश बर्गे, यशेंद्र क्षीरसागर इत्यादी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.