संग्रहित फोटो
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये भविष्यातील मेट्रो विस्तारीकरणाच्या आराखड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुगेवाडी येथील पुणे महामेट्रो कार्यालयात पदाधिकारी आणि संचालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो मार्गाचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) सादर करून भविष्यातील वाहतूक सुधारण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या गेल्या. सकाळी सहा वाजल्यापासून सुरू असलेल्या दौऱ्यादरम्यान, सकाळी सात वाजता ही बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पुणे महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित मेट्रो मार्ग
सध्या प्रस्तावित मार्गाची सुरुवात भक्ती-शक्ती चौकापासून होऊन पुढील ठिकाणांमधून जातो:
मुकाई चौक – भूमकर चौक – भुजबळ चौक – पिंपळे सौदागर – नाशिक फाटा – वल्लभनगर – टाटा मोटर्स कंपनी – तळवडे एमआयडीसी – चाकण एमआयडीसी – चाकण शहर.
या मार्गाची लांबी जवळपास 41-42 किलोमीटर असेल, ज्यात काही बदल होऊ शकतात.
बैठकतील महत्वाचे मुद्दे
वाहतूक सुधारणा आणि औद्योगिक क्षेत्रांवरील परिणाम
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्क, तळवडे एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने मेट्रो मार्ग फायद्याचा ठरेल, असे सांगितले. हिंजवडी आणि चाकणच्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी हा मेट्रो मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत मार्गावरील अंतिम ठराव आणि विस्तारीकरणावर अंतिम निर्णय घेतला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या बैठकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यास मोठा हातभार लागणार आहे, तर औद्योगिक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.