संग्रहित फोटो
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यासोबत ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार का? योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. विरोधकही लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं शिंदे यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले ”लाडकी बहिण योजना सर्वात लोकप्रिय आहे. बंद होणार नाही कारण शेवटी जीवनामध्ये राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये शब्दाला महत्व असते. त्यामुळे जे शब्द आम्ही दिले ते शब्द पूर्ण करण्याचे काम आम्ही करणार. काही लोक म्हणतात निवडणुकीमध्ये आश्वासने द्यायची असतात, परंतु आम्ही तसे नाही. बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरून आपले काम आहे. खुर्ची दिसली की आम्ही रंग बदलत नाही. असे जे लोक आहेत, त्यांचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे.”
अखंड हिंदुत्ववादासाठी शिवसेना व पतित पावन संघटनेचा एकजूट मेळावा कार्यक्रम कर्वेनगर परिसरात उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास प्रारंभ झाला. हिंदू आणि मराठी माणसाला जिवंत ठेवणाऱ्या काही मोजक्या संघटना उरल्या त्यामध्ये पतित पावन संघटनेचे फार मोठे काम आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जन्मच मुळी मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेण्यासाठी झाला आहे. शिवसेना आणि पतित पावन हे भगव्या रंगाचे दोन मजबूत प्रवाह आज एकत्र आलेले आहेत. हिंदुत्वाच्या दृष्टीने हा अतिशय ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
एकनाथ शिंदे म्हणाले, “खरे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमीच हिंदू धर्म या शब्दाला हिंदुत्व हा शब्द वापरला. हिंदुत्व म्हणजे एक हिंदू जीवन पद्धतीचे सार. ते व्यापक आहे आणि म्हणून सावरकरांच्या मते हिंदुत्व एक राजकीय आणि सांस्कृतिक ओळख असली तरी हिंदू राष्ट्र निर्माण करण्यावर त्यांचे विशेष लक्ष होते. जो हिंदुत्व विसरला तो स्वत्व विसरला. जो स्वत्व विसरला तो देश विसरला. जो देश विसरला तो अस्तित्व विसरला आणि जो अस्तित्व विसरला तो मेला. आपली विचारधारा जी आहे ती जोपासली पाहिजे, वाढवली पाहिजे. शिवसेनेने अनेक मित्र जोडले. पण आज होत असलेली जी मैत्री आणि युती आहे ही एकदम वेगळी आहे. दोन्ही विचारधारा सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणाऱ्या आहेत.”
शिंदे पुढे म्हणाले ” पतित पावन संघटना गेली अनेक वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार आणि प्रसार करत आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक राष्ट्रभक्तीचे मूल्य रुजवण्याचे काम संघटनेने केले. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशांमध्ये व्यापक हिंदुत्वाची हाक दिली. गर्वसे कहो, हम हिंदू आहे हा नारा बुलंद करण्याचे काम केले आहे. जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर घाला घालण्याचा प्रयत्न कोणी केला तर सडेतोड उत्तर बाळासाहेबांनी दिले आणि पतित पावन संघटनेने पण दिले. आणि म्हणून शिवसेना आणि पतित पावन संघटना आज एका व्यासपीठावरून एका छताखाली आपण आलेलो आहोत. प्रत्येक देशभक्ताला आज याचा अभिमान वाटेल.”
शिंदे म्हणाले की, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालीमीमध्ये तयार झालेले आपण कार्यकर्ते आहोत आणि त्यांची जी शिकवण आहे ती पुढे घेऊन चाललोय. ज्यावेळी हिंदुत्व अडचणीत आले आणि ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व सोडून इतर विचारधारेची जोडणी होऊ लागली, जे बाळासाहेबांना नको होते ते जेव्हा होऊ लागले त्यावेळेस मात्र या एकनाथ शिंदेने आणि आमच्या सहकाऱ्यांनी उठाव केला. हिंदूत्ववादी सरकार या राज्यात आणले.






