सौजन्य - सोशल मिडीया
Sunetra Pawar News: राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी देताना भेदभाव केल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाजपला ‘सबका साथ सबका विकास’ची आठवण पत्राद्वारे करून दिली आहे. पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच यासंदर्भात पत्र दिले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्राच्या माध्यमातून नगरसेवकांना ‘समान निधी’ देण्याची मागणी केली आहे. सुनेत्रा पवारांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि निधीचे समान वाटप होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात विकासकामांसाठी तरतुद करताना नगरसेवकांना निधी देताना भेदभाव करण्यात आला आहे, असा आरोप केला जात हाेता. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. हे पत्र रिमार्क करुन महापालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहे. महापालिकेत भाजपला पाशवी ११९ नगरसेवकांचे बहुमत प्राप्त झाले आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवर निधीची उधळण होत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना मात्र ‘दुजाभाव’ सहन करावा लागत असल्याचा आरोप केले जात आहेत. या विरोधात आता स्वतः उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्राच्या माध्यमातून ‘समान निधी’ देण्याची मागणी केली.
महापालिकेच्या २०२६-२७ या वर्षाच्या अर्थसंकल्पात भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाला 5 कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भाजपचे स्थायी समिती सदस्य आणि पालिकेतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर तर 10 कोटींचा वर्षाव करण्यात आला आहे. मात्र, याउलट राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांच्या पदरी केवळ ४ आणि ३ कोटी रुपये पडले आहेत. त्याचवेळी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
निधीवाटपाचा मुद्दा अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे हा मुद्दा मांडला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेची आठवण करून दिली आहे. शहरातील कोणत्याही एका भागाला किंवा ठराविक गटाला झुकते माप न देता, सर्व प्रभागांचा विकास समान गतीने होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांना भेदभाव न करता समान निधी देण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. आता सुनेत्रा पवारांच्या या ‘लेटर बॉम्ब’नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि निधीचे समान वाटप होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक पदाधिकाऱ्याकडून निवेदने प्राप्त होत आहेत. राज्य आणि केंद्र स्तरावर आपण ‘महायुती’ म्हणून एकत्र काम करत आहोत. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सत्ताधारी आणि मित्रपक्षांच्या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निधीचे वाटप करणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन, रस्ते विकास आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत गरजा राजकीय पक्षांच्या सीमांपलीकडे आहेत.
कोणत्याही एका प्रभागाला झुकते माप मिळाल्यास दुसऱ्या भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून राहू शकतात. तरी ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयानुसार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पार्टीच्या सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या प्रभागासाठी समान निधी देण्यासाठी संबंधितांना योग्य ते निर्देश व्हावेत, ही विनंती असे पत्रात नमूद केले आहे.
नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात निधी देताना दुजाभाव झाला आहे. त्यामुळे अनेकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे गऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रावर रिमार्क लिहून पुणे महापालिका प्रशासनाला पाठवला आहे. हे पत्र म्हणजे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. – निलेश निकम, विरोधी पक्ष नेते, पुणे महापालिका.






