रायगडवरून वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
महाराष्ट्राचे माजी राज्यसभा खासदार आणि कोल्हापूरच्या राजघराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ बांधलेले कुत्र्याचे स्मारक हटवण्याची मागणी केली आहे. यानंतर राज्यात राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. दरम्यान, हिंदू नेते संभाजी भिडे यांनी संभाजीराजे यांच्या मागणीला विरोध केला आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं असून सगळे समाज एकमेकासोबत आहेत. या बाबतीत वाद करणं अयोग्य आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“तसेच तिथे गेल्या अनेक वर्षांपासून वाघ्याचा पुतळा किंवा समाधी आहे. सर्वाशी चर्चा करुन, वाद न घातला मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं काही आहे का? त्यामुळे वाद करण्याचं कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतात. एकीकडे धनगर समाज आणि इकडे मराठा समाज वेगळा. सगळे समाज एकमेकासोबत आहेत. या बाबतीत वाद करणं अयोग्य आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे यांनी दावा केला की, ‘संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते चुकीचे आहे. वाघ्या कुत्र्याची गोष्ट खरी आहे. वाघ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली. त्या काळातील लोक कुत्र्यांसारखे निष्ठावंत नव्हते हे दाखवण्यासाठी हा पुतळा आवश्यक आहे. २२ मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात, संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना ३१ मे पूर्वी हे स्मारक काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “काही दशकांपूर्वी, १७ व्या शतकातील राजवटीत राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ वाघ्या नावाच्या कुत्र्याचे स्मारक बांधण्यात आले होते.”
शिवाजी महाराजांच्या या कथित पाळीव कुत्र्याच्या वाघ्या अस्तित्वाबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे, हे स्मारक कायदेशीररित्या संरक्षित वारसा स्थळावर अतिक्रमण करण्यासारखे आहे. संभाजीराजे म्हणाले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने वाघ्याच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे किंवा लेखी कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट केले आहे. याला ‘दुर्दैवी’ म्हणत ते म्हणाले की, हा महान शिवाजी महाराजांच्या वारशाचा अपमान आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघ्याच्या निष्ठेची आणि शौर्याची कहाणी आजही प्रसिद्ध आहे. काही जण याला शिवाजी महाराजांच्या कथेचा अविभाज्य भाग मानतात, तर काही जण म्हणतात की ते ऐतिहासिकदृष्ट्या अप्रमाणित आहे. वाघ्या हा मिश्र जातीचा कुत्रा होता, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळले होते असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर, त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वाघ्याने त्यांच्या चितेत उडी मारून स्वतःला जाळून घेतले.
या कारणास्तव, रायगड किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्याचा पुतळा बसवण्यात आला. २०११ मध्ये संभाजी ब्रिगेडच्या कथित सदस्यांनी निषेध म्हणून वाघ्याचा पुतळा काढून टाकला असला तरी, नंतर तो पुन्हा बसवण्यात आला.






