कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून उपनगरीय लोकल प्रवास करणारे प्रवासी यांनी पार्किंग केलेल्या सर्व सहा दुचाकी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. परिसरात असलेल्या गवताला आग लागली आणि त्यामुळे पेट घेतल्याने भर दुपारी लागलेली आग त्या दुचाकी पर्यंत पोहचली आणि त्यात त्या सर्व सहा दुचाकी आगीत जळून भस्मसात झाल्या आहेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य रेल्वेचे मेन लाइन वरील कर्जत दिशेकडे असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी हे आपल्या दुचाकी स्थानकाच्या बाहेर पार्किंग करून ठेवतात.गेली अनेक वर्षे त्या गाड्या तेथे पार्किंग करून हे प्रवासी नोकरीच्या ठिकाणी जातात आणि नंतर सायंकाळी रात्री भिवपुरी रोड येथे परत आल्यावर दुचाकी घेऊन घरी परतत असतात.बार्डी गावातील तुषार मोहन कांबरी तसेच चांदइ येथील शिवसृष्टी तसेच रीवा रिदम या सोसायटी मधील रहिवाशी यांच्या त्या दुचाकी होत्या.आज सकाळी त्या सर्व सहा दुचाकी नेहमीचे ठिकाणी पार्किंग करून ते प्रवासी आपल्या नोकरीचे ठिकाणी गेले होते.
आज दुपारी पावणे दोन ते दोन चे दरम्यान त्या दुचाकी पार्किंग केलेल्या ठिकाणी असलेल्या गवताला आग लागली.येथील गवत सुकलेले असल्याने आग अधिकच भडकली आणि त्यामुळे त्या आगीचे लोळ हे दुचाकी यांच्या जवळ पोहचले आणि त्यामुळे पेट्रोल वर चालणाऱ्या त्या गाड्यांना आग लागली आणि त्या आगी मध्ये सर्व सहा गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आणि त्यांचे १०० टक्के नुकसान झाले.
आग लागल्याचे पाहताच भिवपुरी रोड स्थानकातील रेल्वे कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली.आग विझवण्यासाठी आणलेले साहित्य अपुरे पडले आणि त्यामुळे आरपीएफ आणि रेल्वे कर्मचारी यांचे प्रयत्न अपुरे पडले.भिवपुरी स्थानकातील रूपकुमार आणि अक्षय देशमुख यांनी आग विझवण्यासाठी स्वतः मोठे प्रयत्न केले. या अचानक लागलेल्या आगी मध्ये सर्व सहा दुचाकी यांचा चक्काचूर झाला असून त्या गाड्या कोणत्या कंपनीच्या होत्या त्या गाड्यांचे क्रमांक कोणते होते ते देखील समजून येत नाहीत अशी स्थिती आगी नंतर झाली आहे.