मुसळधार पावसाचा देवगड तालुक्याला तडाखा; वादळी वाऱ्यामुळे कुणकेश्वर, मणचे, शिरवलीत घरांचे नुकसान
देवगड : देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे व झाडांचे नुकसान झाले. कुणकेश्वर, मणचे आणि शिरवली परिसरात घरांच्या छपरांवरील सिमेंट पत्रे उडणे, भिंती कोसळणे व झाडे घरांवर पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला, असे असूनही पावसाने जुलैच्या पाच तारखेपर्यंत एक हजाराचा टप्पा देखील पूर्ण केला आहे.
देवगडमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. रविवारी (दि. ५) १०६ मिली मीटर पाऊस तालुक्यात झाला. वादळी वाऱ्यामुळे कुणकेश्वर येथील सत्यवान दत्ताराम कुणकेश्वरकर यांच्या घराच्या सिमेंट पत्र्याच्या छपराचे नुकसान झाले. तर मणचे येथील गोविंद तुकाराम गुरव यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळली. शिरवली येथील मंगेश भिकाजी कदम यांच्या घरावर सागाचे झाड कोसळल्याने छपराचे नुकसान झाले.
देवगड तालुक्यात सुमारे १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामात आतापर्यंत १०५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
समुद्र खवळला; किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने ३ ते ७ जुलैदरम्यान समुद्रात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा व मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर देवगड तालुक्यात त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. समुद्र खवळल्याने उंच लाटा किनाऱ्याला धडकत असून, किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
घरावर झाड, भिंत कोसळून नुकसान
मुसळधार पावसामुळे सखल भागातील भातशेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवनही विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे हिंदळे येथील जनार्दन महादेव राणे यांच्या गोठ्यावर मोठे झाड कोसळून नुकसान झाले. कातवणेश्वर येथील संजय तुकाराम आचरेकर यांच्या गोठ्याची कंपाउंड वॉल कोसळून अंदाजे २२ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
किनारपट्टी परिसरातील कामे तात्पुरती बंद
समुद्रातील उग्र परिस्थिती लक्षात घेऊन किनारपट्टी भागातील नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहावे, किनारपट्टी परिसरात सुरू असलेली विविध कामे तात्पुरती बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कुणकेश्वर सागरी महामार्गालगतची दुकानेही खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






