अकलुज / कृष्णा लावंड : माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना भाजपनं डावलत पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं धैयशील मोहिते पाटील नाराज होते. दोन दिवसांपूर्वी या नाराजीचं महानाट्य खुद्द भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनाही अनुभवायला मिळालं होतं. यानंतर मोहिते पाटील यांची नाराजी भाजपला परवडणारी नसल्याचं सांगत याबाबत पक्षश्रेष्टींना बोलणार असल्याचं आश्वासन संतप्त मोहिते समर्थकांना दिल्यावर महाजन यांची सुटका झाली होती.
भाजपकडून मोहिते पाटील यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला, तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी कालपासून माढा लोकसभा मतदारसंघात अनौपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी करमाळा तालुक्यात श्रीदेवीचा माळ, पोथरे, कामोणे, बिटरगावश्री, आळजापूर,खडकी, जातेगाव, पुनवर, वडगाव आणि मांगी या गावात गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची या मानसिकतेमध्ये असणारे धैयशील मोहिते पाटील समर्थकांकडून शरद पवार यांची तुतारी घेण्याचा आग्रह सुरू असला तरी अद्याप मोहिते पाटील यांनी भाजप सोडण्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही.
असं असताना कालपासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून दौऱ्यासाठी करमाळा येथून सुरुवात केली आहे. यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असून, प्रश्न सोडवला नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, बारामती, सोलापूर आणि माढा या चार लोकसभा मतदारसंघात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.
मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग
विजयसिंह मोहिते पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्यानंतर त्यांच्या गटाचं नेतृत्व केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवार यांच्यानंतर सर्वात जास्त कार्यकर्त्यांची फळी जपणारा नेता म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची ओळख आहे. हेच गणित डोक्यात ठेवून थेट नरेंद्र मोदी याना आणून 2019 मध्ये मोहिते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. गेल्यावेळी पक्षाने दिलेला उमेदवार म्हणून रणजित निंबाळकर यांना मोठा विजय देऊन राष्ट्रवादीच्या हातातून हा मतदारसंघ मोहिते पाटील यांनी खेचून आणला होता.
पुन्हा निंबाळकर यांनाच संधी दिल्याने मोहिते समर्थक नाराज
यावेळी पहिल्यापासून मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेवर दावा केल्यानंतर त्यांनाच उमेदवारी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, पक्षाने पुन्हा निंबाळकर यांनाच संधी दिल्याने मोहिते समर्थक नाराज झाले. यानंतर ‘माढा आणि निंबाळकर यांना पाडा’ ही मोहीम समर्थकांनी सुरु केली. आता त्याचा पुढचा अंक म्हणून थेट मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून गावभेट दौऱ्याला सुरुवात करून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
तर दुसऱ्या बाजूला माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सहापैकी पाच आमदारांनी भाजपने दिलेले उमेदवार रणजित निंबाळकर यांनाच विजयी करण्याचा निर्धार सोमवारी रात्री टेंभूर्णी येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला. मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी झालेल्या महानाट्याचा दुसरा भाग काल टेंभूर्णी येथे पाहायला मिळाला होता.