नागपूर : नायलॉन मांजा विरोधात पोलिस सतत कारवाई करत आहेत. त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची लपून-छपून विक्री होत आहे. लोभाला बळी पडून विक्रेते निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले आहे. शनिवारी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून चार जणांना नायलॉन मांजासह अटक केली. पहिली कारवाई गुन्हेशाखा युनिट 5 च्या पथकाने केली.
कोराडीच्या मासोळी बाजारात सापळा रचून सुजल रमेश बोकडे (19) रा. पाटणसावंगी, याला पकडले. झडतीमध्ये त्याच्याजवळ नायलॉन मांजाचे 8 बंडल मिळाले. दुसऱ्या कारवाईत तहसील पोलिसांनी भावसार चौकाजवळ रियाज शेख (34) रा. हसनबाग, याला पकडले. त्याच्याजवळून 8 चकरी जप्त केल्या. कळमना पोलिसांनी भरतवाडा मार्गावर नीरज किशोर बोरकर (23) रा. आनंदनगर, बिनाकी मंगळवारी, यास पकडले. तो नायलॉन मांजाच्या 6 चकरी घेऊन जाताना सापडला.
कळमना पोलिसांच्याच दुसऱ्या पथकाने विजयनगरच्या धनलक्ष्मी सोसायटीत धाड टाकून भुवनेश्वर गावकरण शाहू (34) याला पकडले. झडतीमध्ये त्याच्या घरून 6 चकरी जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी नागरिकांना नायलॉन मांजाचा वापर न करण्याची विनंती केली आहे. तसेच नायलॉन मांजाची विक्री करणारे आणि त्याचा वापर करणाऱ्यांची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन केले आहे.
सर्वच उड्डाणपूल राहणार बंद
मकरसंक्रांतीनिमित्त शहरात होणारी पतंगबाजी आणि नायलॉन मांजाचा वापर यामुळे होणारे अपघात लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी सोमवारी शहरातील सर्वच उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना उड्डाणपुलाचा वापर न करता खालच्या रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.