जि.प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या जातप्रमाणपत्र प्रकरणाची १५ जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी, प्रकरण अंतिम टप्प्यात
सातारा, दि. १४ (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया महेश शिंदे यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर येत्या १५् जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात सुनावणी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेश सचिव तथा सातारा जिल्हा प्रवक्ते प्रवीण धसके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धसके यांनी सांगितले की, जातप्रमाणपत्र पडताळणी समितीसमोरील सुनावणी अंतिम टप्प्यात असून दक्षता पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. हरकतदारांची हरकत फेटाळल्यानंतर हे प्रकरण दक्षता पथकाकडे वर्ग करण्यात आले होते. त्याविरोधात डॉ. शिंदे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी धसके यांनी डॉ. शिंदे यांनी समितीसमोर सादर केलेल्या पुराव्यांबाबत गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, सादर करण्यात आलेली काही कागदपत्रे आणि पुरावे संशयास्पद असून, यासंदर्भातील माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रे तसेच नकलाही समितीसमोर सादर करण्यात आल्या आहेत. समितीसमोर सत्य परिस्थिती स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला.
धसके यांनी पुढे सांगितले की, डॉ. प्रिया शिंदे यांचे माहेर चिंचणेर-वंदन येथे असून महसुली नोंदींमधून त्यांची वंशावळ स्पष्ट होत असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच खटाव तालुक्यातील मोळ-मजरे भाकरवाडी येथील काही दस्तऐवजांच्या आधारे प्रशासनाची दिशाभूल करून लाभ मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
जातप्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुरू असलेल्या प्रक्रियेत संबंधित पुरावे तपासल्यानंतर अंतिम निर्णय होईल. समितीचा निर्णय डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षपदावर परिणाम करणारा ठरू शकतो, असा दावा धसके यांनी पत्रकार परिषदेत केला.
सातारा जिल्हा बँक निवडणूक पूर्वतयारीने तालुक्यातील वातावरण ढवळले; ठरावांसाठी बैठकांचे सत्र सुरू






