सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत ९ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एवढी गंभीर दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून अद्याप संबंधित ठेकेदार, जबाबदार अधिकारी किंवा दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. १३) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त सूर्यवंशी यांना एक सविस्तर पत्र सादर केले. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची उच्चस्तरीय व कालबद्ध चौकशी करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
बंद प्रकल्पाच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह
खासदार बारणे यांनी पत्रात नमूद केले आहे की, मोशी येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्प गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बंद होता. विशेष म्हणजे, ३० जून २०१६ रोजी या प्रकल्पाच्या परवानगीची मुदत संपली होती. त्यानंतरही कोणत्या कायदेशीर परवानग्यांच्या आधारे हा प्रकल्प सुरू ठेवण्यात आला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ मधील सुरक्षा तरतुदींचे व नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे. शहरात दररोज येणाऱ्या कचऱ्याची नियमानुसार विल्हेवाट न लावल्यामुळेच कचऱ्याचा प्रचंड डोंगर निर्माण झाला आणि ही दुर्घटना घडली, असा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला.
अँटोनी लारा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या
मोशी येथील कचरा डेपो परिसरात ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. एसआरएफएलपी प्रक्रियेदरम्यान संभाव्य धोका माहिती असूनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना न राबवल्यामुळे कचऱ्याचा भाग कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी रोहित मधुकर निकम (वय ५५) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय ५५) आणि सुरक्षा अधिकारी विजय रामराव सपकाळ (वय ३८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुप्ता याला अटक केली आहे.






