वडगाव मावळमध्ये ड्रग अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने काळजी व्यक्त केली जात आहे (फोटो सौजन्य - iStock)
वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरात अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने तरुणाई या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालली आहे. तरुण पिढीला ड्रग, गांजा, गुटखा, आदी अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. हे मागील काही घटनांमधून निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे पदार्थ विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडगाव शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत पोलिस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर, मुख्य विश्वस्त किरण भिलारे, मकरंद बवरे, युवा अध्यक्ष आतिश ढोरे, रविंद्र म्हाळकर ,नितीन ओव्हाळ, आदी पदाधिकारी उपस्थित होते
निवेदन म्हटले आहे की, मावळ तालुक्याचे मुख्यालय आहे वडगाव शहरात जिल्हा सत्र न्यायालय वडगांव पोस्ट ऑफिस, तालुका पंचायत समिती, शाळा, कॉलेज व इतर सरकारी/निमसरकारी कार्यालये आहेत.वडगांव-मावळ तालुक्याची क्रिडा नगरी म्हणून नावलौकिक आहे. शहरात व आजूबाजूच्या गावांमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. वडगांवचे जागृत देवस्थानला क दर्जा प्राप्त झालेला आहे. अशा नावलौकिक असणाऱ्या सांस्कृतिक वडगांव शहारात जुगार, मटका, असे अवैध धंदे तसेच बेकायदेशीर गावठी दारू, ड्रग्स, गुटखा, गांजा असे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असे जाणवत आहे. त्यामुळे गावातील शांतता सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता जाणवत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वडगाव परिसरातील, कुडे वाडा मातोश्री चौक सरदार महादजी शिंदे उद्यान परिसर,दिग्विजय कॉलनी,चौक, तळेगाव-वडगाव फाटा, ढोरे वाडा- केशवनगर परिसर, महामार्गावर लगत पान टपऱ्या आदी परिसरात खुलेआम अमली पदार्थांची विक्री होत असल्यामुळे स्थानिक शाळकरी, कॉलेज युवक, कष्टकरी युवक मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. विक्री करणारे विक्री करतात परंतु खरेदी करणारा स्थानिक युवक नशाप्राशन करण्यासाठी उघड्यावर दिवसा कोणाला न जुमानता, न घाबरता नशा करताना दिसुन येत आहेत.
मात्र या साऱ्या प्रकाराकडे वडगाव मावळ पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अंमली पदार्थाचे आहारी तरूण पिढी मोठ्या प्रमाणात गेल्याचे जाणवत आहे. गुटखा MD व गांजा, दारू व इतर अंमली पदार्थ विक्रीचे काम छुप्या मार्गाने होत आहे.अंमली पदार्थ MD ड्रग्स, गांजा व गुटखा, दारू, ताडी यांसारखे अन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व ते त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी बोलताना शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर म्हणाले की, “वडगाव शहराची ओळख कला, क्रीडा सांस्कृतिक क्रीडा नगरी म्हणून ओळखली जात आहे या ठिकाणी शाळा व महाविद्यालयांच्या जवळ अनेक पान टपऱ्यांमध्ये, दुकानांमध्ये एमडी पावडर ड्रग्स गांजा तसेच काही व्यक्तींकडे आरोग्याला घातक गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत. त्याची बिनदिक्कतपणे विक्री व सेवन केले जाते त्यामुळे या सर्व गोष्टींवर पोलिस प्रशासनाचा यावर वचक असावा,” अशी मागणी म्हाळसकर यांनी केली आहे.