अंड्याच्या दरात झाली विक्रमी वाढ; 15 दिवसांमध्ये 18 रुपयांनी अंडी महाग (सौजन्य - सोशल मिडीया)
मुंबई : राज्यातील बाजारपेठांमध्ये अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात धाराशिव, लातूरसह काही जिल्ह्यांमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती. त्यामुळे शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. त्याचा फटका आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे साखळी पुरवठ्यावर परिणाम झाला. यामुळे अंडींचे दर कमालीचे वाढले आहेत.
एकीकडे मागणी जास्त आणि उत्पादनावर परिणाम या व्यस्त प्रमाणामुळे अंड्यांचा भाव वधारला आहे. आषाढातच अंड्यांसाठी ग्राहकांच्या खिशावर बोजा पडला आहे. १२ नग अंडींसाठी आता जादा पैसा मोजावे लागत आहे. अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर ७८ ते ९० रुपये डझनपर्यंत पोहोचले आहेत. मार्चमध्ये मुंबईत १०० अंडींसाठी घाऊक दर ४७० रुपये होता, तो जूनच्या अखेरीस ५९१ रुपये इतका झाला आहे.
वाहतुकीतील अडथळ्यामुळे पुरवठा विस्कळीत झाला. उष्म्यामुळे पक्ष्यांच्या मृत्यूमुळे उत्पादन घटले आणि पावसाळ्यात वाहतुकीतील अडथळ्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली, असे पोल्ट्री व्यवसायिकांचे म्हणणे आहे. लोखंडवाला येथे अंडी ९० रुपये, वांद्रे आणि बोरिवलीत ८० रुपये, तर वसईत ७८ रुपय दराने विकली जात आहेत. ऑनलाईन खरेदीदारांना चेंबूर आणि कांजुरमार्ग येथे ११७रुपये डझन दर मोजावा लागत आहे. सहा ‘स्पेशल अंडी’च्या बॉक्सची किंमत ५७ रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहे.
दरम्यान, पुण्यात अंड्याचा दर १५ दिवसांत ६६ वरून ८४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एनईसीसीनुसार जून २०२५ मध्ये दर पाच वर्षांत सर्वोच्च पातळीवर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. इतकेच नाही तर अंडा भुर्जी आणि इतर खाद्यपदार्थासाठी सुद्धा ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.






