ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या 'या' महत्वाच्या नेत्याला हृदयविकाराचा झटका!
अनिल शिंदे हे केवळ जिल्हाप्रमुखच नव्हे, तर ते स्वतः प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवार आहेत. याशिवाय, शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. सोमवारी रात्री त्यांच्या घरी निवडणूक यंत्रणेतील तपास पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी ते कुटुंबासह घरी उपस्थित होते. घरातील महिला आणि लहान मुले या प्रकारामुळे घाबरून गेली होती.
Maharashtra Politcs: प्रचार थांबला, पण राजकारण पेटलं! पुण्यनगरीत छुप्या प्रचाराचा ‘काळा खेळ’ उघड
या छाप्यात कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी या कारवाईदरम्यान अनिल शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारल्याचे समजते. याच चर्चेदरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. शिंदे यांना यापूर्वीही हृदयविकाराचा त्रास होता. नोव्हेंबर महिन्यातही त्यांना अशाच त्रासाला सामोरे जावे लागले होते.
महापालिका निवडणुकीत महायुती तुटल्यामुळे शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवत आहे. ऐनवेळी युती तुटल्याने काही प्रभागांमध्ये उमेदवार शोधण्याची वेळ पक्षावर आली. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यावा लागला. या सगळ्या घडामोडींचा मोठा ताण अनिल शिंदे यांच्यावर होता. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या छाप्यामुळे ते प्रचंड तणावाखाली गेले आणि त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जाते.
त्यांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेसह विविध पक्षांचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात मोठी गर्दी होती.
हॅबिल्डची ८व्या जागतिक विक्रमाला गवसणी! एकाच दिवशी ९.३ लाख जणांचा ऑनलाइन योग सत्रात सहभाग
अनिल शिंदे यांचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर शिंदे कुटुंबीयांनी प्रशासन आणि भाजपा-राष्ट्रवादी युतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनिल शिंदे यांच्या पत्नी आणि माजी महापौर शीला शिंदे यांनी, “जर शिंदे यांना काही झाले, तर छापा टाकणारे अधिकारी आणि यामागील सूत्रधारांना सोडले जाणार नाही,” असा इशारा दिला. त्यांनी या घटनेला भाजपा-राष्ट्रवादी युती जबाबदार असल्याचा आरोप केला.
अनिल शिंदे आणि शीला शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या घटनेची संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली असून, गरज भासल्यास एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. सध्या अनिल शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते.
या संपूर्ण घटनेमुळे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार का, शिंदे गटाला सहानुभूतीचा फायदा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






