'आजचा औरंगजेब सुतारवाडीला..' शिंदे गटाच्या बड्या नेत्याने सुनील तटकरेंना दिली मुघल बादशाहची उपमा
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन अजूनही रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले या दोघांनीही पालकमंत्रिपदाबाबत आग्रह केला आहे. या प्रकरणावरुन तटकरे आणि गोगावले समर्थक आमनेसामने झाले आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांची तुलना औरंगजेबाशी केल्याने खळबळ उडाली आहे.
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, ‘छावा चित्रपटामध्ये दाखवलय.. औरंगजेबाचं स्थान अकलूजमध्ये दाखवलं होतं. महाराष्ट्रातल्या अकलूज येऊन डेरा बांधून त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं. आजचं अकलूज कुठंय? सुतारवाडीला.. आजचा औरंगजेब कुठंय.. तर तो सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. चुकीच्या पद्धतीने आमच्याशी राजकारण कराल, तर लक्षात ठेवा. कर्जत मतदारसंघ लढत आहे. भरत गोगावले यांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन लोकसभा लढायची तयारी आम्ही ठेवू, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘क्रिकेटच्या खेळात पंचांचा निर्णय अंतिम असतो. कॅप्टन कूल असला, तर स्पर्धा जिंकता येतात. असे ते म्हणाले होते. त्यांना मी सांगू शकतो. कॅप्टन कूल असला तरी, त्याने सोबतच्या खेळाडूंना प्राधान्य देणे गरजेचे असते. आपण कॅप्टन व्हायला चालला आहात. माझीच मुलगी खेळाडू, माझाच मुलगा खेळाडू, सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात.. हे चालणार नाही’ असे थोरवे म्हणाले.
तुम्ही क्रिकेट खेळाचं आम्हाला उदाहरण देऊ नका. पंचांनी निर्णय दिला असला तरी आज क्रिकेट पुढे गेलं आहे. क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर आहे. आता थर्ड अंपायरने तो निर्णय चुकीचा आहे असं म्हटल्याने निर्णय स्थगित करण्यात आली आहे,’ असे म्हणत थोरवे यांनी राजकीय घडामोडींशी क्रिकेटचे कनेक्शन लावून तटकरे यांच्यावर टीका केली.