"आम्ही लोककल्याणाचा मार्ग निवडला आणि त्यांनी..." एकनाथ शिंदेनी लगावला उबाठाला टोला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची सुद्धा भेट घेतली आहे. यानंतर शिंदेनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
बाळासाहेबांनी जो लोककल्याणाचा मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्ही चाललोय, मात्र काहीजण १० जनपथकडे गेले. बाळासाहेबांना कधीही आवडलं नाही त्या गोष्टी ते करत आहेत, असा टोला शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सहकुटुंब भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या लोककल्याणाच्या मार्गाने पुढे जातोय, मात्र काहीजण दिल्लीत येऊन १० जनपथकडे जातात. जे बाळासाहेबांना कधीही आवडलं नाही ते काहीजण करत आहेत. हा फरक देशातील जनता पाहतेय, असे ते म्हणाले. शिवसेना हा लोककल्याणाचा पक्ष आहे तर त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.
Thane News : ठाणेकरांसाठी पर्वणी! शहरात पावसाळी रानभाजी महोत्सवाचं आयोजन
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आघाडी आणि युती करण्याचा अधिकार आहे, मात्र काहीजण विश्वास गमावल्यामुळे दोन दगडावर पाय ठेवून काम करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी उबाठाला लगावला. लोक कामावर मते देतात. जे कामं करतात त्यांना लोक मते देतात. घरी बसणाऱ्यांना लोक घरी बसवतात, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना ते मूग गिळून बसले, कारण त्यांनी हिंदुत्व सोडले, अशी खरमरीत टीका त्यांनी उबाठावर केली. लष्कराच्या शौर्यावर शंका घेणे, भारताची आणि पंतप्रधानांची विदेशात बदनामी करणे, पाकिस्तानाची भाषा बोलणे हे देशप्रेम नाही तर पाकिस्तान प्रेम आहे, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
महादेव अर्थात शंकराने वाईट प्रवृत्ती नष्ट करुन विजय मिळवला. तशाच प्रकारे लष्कराने ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या मोहीमांच्या यशाचे प्रतीक म्हणून आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महादेवाची प्रतिमा भेट दिली.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार किशोर नांदिवडेकर यांनी हे पेंटिग तयार केले आहे. दोन फूट बाय अडीच फूटाच्या महादेवाच्या पेंटिंग्जमध्ये महादेवाचे विविध भाव प्रकट होत आहे. पृथ्वीवर साधुसंतांना त्रस्त देणाऱ्या राक्षसांना कंठस्नानी पाठवण्याचे काम भगवान शंकराने केलं, असे नांदिवडेकर म्हणाले. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर काँग्रेस आणि इंडि आघाडीने संशय घेतला होता, मात्र ऑपरेशन महादेव यशस्वी झाले आणि दहशतवाद्यांना ठार करण्याची तमाम भारतीयांची इच्छा पूर्ण झाली म्हणून पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा देण्यात आली.