फोटो सौजन्य - Social Media
महाबळेश्वर : महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती शकुंतला रमेश चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, बांधकाम आणि कृषी विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रखडलेली विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली. वाढत्या उष्णतेमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
शिक्षण विभागाच्या आढाव्यात शाळा खोल्यांची दुरुस्ती, नवीन इमारतींचे बांधकाम तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत चर्चा झाली. दिव्यांग विद्यार्थ्यांचा भत्ता आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटप यांचाही आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागाने १ ते ७३ निर्देशांकांनुसार कामगिरी सादर करताना सर्पदंश व श्वानदंशावरील लसींचा साठा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बांधकाम विभागाने जनसुविधा आणि यात्रास्थळ विकासाशी संबंधित २१ कामांची माहिती दिली. रखडलेली कामे करणाऱ्या कंत्राटदारांशी स्वतंत्र बैठक घेऊन अडचणी समजून घेण्याचे आणि कामे गतीने पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी सांगितले की, पंचायत समितीला मिळालेला सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी नियोजनबद्ध पद्धतीने आणि वेळेत खर्च करणे आवश्यक आहे.
कृषी विभागाला बी-बियाणे आणि खतांचा पुरवठा वेळेत करण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. पशुसंवर्धन विभागाला जनावरांमध्ये पसरणाऱ्या ‘खोडा’ आजाराबाबत सतर्क राहण्यास आणि चारा टंचाईचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
गट विकास अधिकारी विजय विभुते यांनी सर्व विभागप्रमुखांना लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे आणि विविध योजनांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. अधिकारी आणि पदाधिकारी यांनी समन्वय राखून जनतेची कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सभेला उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय शेलार, वंदना भिलारे तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे, अजित संकपाळ आणि सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.






