यवत : पुणे येथील रेशनिंगचे धान्य केडगावातील एका व्यापाऱ्याला काळ्या बाजारात विकण्यासाठी घेऊन जाताना तीन टेम्पोसह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेशन पथकाने सापळा लावून पकडले. पुणे-सोलापूर महामार्गावर कासुर्डी टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली. या तीन टेम्पोत २१७ पोती तांदूळ, १६ पोती गहू, १ पोती हरभरा असल्याचे आढळून आले. तर पोलीस चौकशीत पुणे येथील रेशनिंगचे धान्य केडगाव येथील व्यापाऱ्याला विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
पुण्यातील रेशनिंगचे धान्य केडगाव येथील एका व्यापाऱ्यास विकण्यासाठी तीन टेम्पोतून नेले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकानेत्वरित दखल घेऊन पुणे -सोलापूर महामार्गावर सापळा लावला. त्यावेळी संशयित टेम्पो आणि चार इसमांना या पथकाने शिताफीने पकडले. त्यांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
पोलिसांना का नाही माहिती ?
पुणे येथून दौंडमधील काही व्यापाऱ्यांना रेशनिंगचे धान्य नेहमीच काळ्या बाजाराने पुरवण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र, याची यवत पोलिसांना खबर लागत नाही की, माहिती असूनही या बाबत कारवाई करण्याकडे डोळेझाक केली जाते, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
धान्य घेणारा व्यापारी कोण ?
पुणे येथून रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी कोण पाठवतो ?. तसेच हे काळ्या बाजारातील धान्य केडगाव येथील कोणता व्यापारी खरेदी करीत आहे ? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे पोलीस तपासात नेमकी कोणती माहिती समोर येते आणि केडगावातील कोणत्या व्यापाऱ्यांवर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.