संग्रहित फोटो
मुंबई : मुंबईतील लोकलमध्ये बॉम्बस्फोट (Bomb blast in Local Trains) करण्यात येणार आहे, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला होता. या फोननंतर पोलिसांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला त्याची माहिती दिली आणि फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. अवघ्या दोन अडीच तासांतच फोन करणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. फोन करणाऱ्याला अटक केल्यानंतर हा फेक कॉल (Fake Call) असल्याचे स्पष्ट झाले.
रविवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या सुरुवात केली. नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहेत. लोकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लगेच त्यानंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने फोन बंद केला होता.
त्यानंतर सीरिअल कंट्रोल रुमला फोन आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधून काढले. आरोपी जुहू परिसरात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी लगेच जुहू पोलिसांना याबाबतची माहिती दिली. जुहू पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
अडीच तासांत कारवाई
अवघ्या दोन-अडीच तासांतच जुहू पोलिसांनी या फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल करणाऱ्या अशोक मुखियाला जुहू पोलिसांनी विलेपार्ले येथील नेहरू नगर परिसरातून अटक केली.