मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; पावसाअभावी पिके आली संकटात (File Photo : Crop)
भिवापूर : शेतकऱ्यांचे कापूस आणि सोयाबीन हे प्रमुख खरीप हंगामातील पीक आहे. याच पिकावर संपूर्ण शेतकऱ्यांचे बजेट असते. सोयाबीन पिकाची मळणी सुरू आहे. सोयाबीन बाजारात नेल्यानंतर योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चदेखील भरून निघत नाही. त्यामुळे अल्प पैशांमध्ये शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करावी, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
मागील 2023 च्या वर्षांमध्ये सोयाबीन पिकावर येलो मोजॅक व अतिवृष्टीमुळे हातचे पीक वाहून गेले होते. पण यावर्षी गतवर्षीपेक्षा सोयाबीन पीक बऱ्यापैकी आले. किमान उत्पादन खर्च निघून मुलांना कपडे, फटाके घेऊन दिवाळी साजरी करण्याच्या आशा शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर होत्या. पण बाजारात सोयाबीन विक्रीस नेल्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा सोयाबीनचे दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील शेती कशी करायची, हा पेच शेतकऱ्यांसमोर आहे.
सोयाबीन पिकाला हमीभाव 4892 असून सुद्धा हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जात नाही. चार हजार पासून ते चार हजार 500 रुपयापर्यंत बाजारपेठेत सोयाबीन खरेदी केल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळेल असे शेतकऱ्यांना वाटले होते. परंतु भाव काही केल्या मिळत नाही.
एकरी 25 हजारांचा खर्च
सोयाबीनचा पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च काढला, तर 25 हजार रुपये एकरपर्यंत येतो आणि संपूर्ण सोयाबीन शेतकऱ्यांनी विकला, तर 30 हजार रुपये त्यांच्या हातात येत आहे. मग या उरलेल्या पाच हजार रुपयांमध्ये दिवाळी साजरी कशी करायची आणि रब्बी हंगामाला बी बियाणे, खते कुठून घ्यायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
दिवाळीच्या अगोदरच सोयाबीन कापणीला वेग
दिवाळी सणाच्या अगोदरच सोयाबीन कापणीला वेग आला आहे. हमीभावही शेतकऱ्यांना परवडेना : सरकारने शेतकऱ्यांच्या पदरामध्ये सोयाबीनचा भाव पाडण्यासाठी हमीभाव 4892 रुपये जाहीर केला, परंतु शेतकऱ्यांनी सोन्यासारखी पिकवलेले सोयाबीन मातीमोल भावाने बाजारात विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चदेखील शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. किमान सोयाबीनला सहा हजार रुपये भाव सरकारने द्यावा, तरच शेतकऱ्यांना सोयाबीनचे पीक परवडेल.