माढा : सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचा मुद्दा पेटलेला असून यामध्ये तोडगा निघालेला नाही. यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. माढा -कुर्डूवाडी मार्गावर रिधोरे येथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने तर माढा शहरात शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दोन्ही आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलक शेतकरी हातात ऊस घेऊन बसले होते. ऊसाला पहिली उचल २५०० रुपये मिळावी आणी अंतिम दर ३१०० रुपये प्रतिटन मिळावा तसेच तुकाराम मुंढे या प्रशासकीय अधिकाऱ्याची साखर आयुक्त पदी नियुक्ती करावी, या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीने बार्शी कुर्डूवाडी मार्ग रोखुन धरला. दोन तासांहुन अधिक वेळ आंदोलन चालले.
माढा तालुक्यातील बेबळे गावातील प्रमोद भोसले या ऊस टोळी मालकाचा मध्य प्रदेश मध्ये ऊस मजुरांनी खुन केला होता. या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी शंभु साठे, अमर पालकर, हनुमंत धुमाळ, संतोष पाडुळे, शरद भांगे, गौतम शिंदे, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
२५०० रुपये पहिली उचल द्या
आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, सिद्वेश्वर घुगे यांच्यासह विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, ऊस दर संघर्ष समितीचे सदस्य सहभागी झाले होते. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शंभु साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ऊसाला २५०० रुपये पहिली उचल मिळावी तसेच ३१०० रुपये अंतरिम दर मिळण्याची आग्रही मागणी केली.