पावसाची प्रतीक्षा ; पेरणीची झाली तयारी
संभाजीनगर : राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होत आहे. तर काही भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे. अवकाळी पावसाने अजूनही जमिनीत ओल असून, यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणीही आटोपली आहे. तर काही शेतकरी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा करत असून, शेतकऱ्यांची पेरणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे.
अजिंठा परिसरातील अजिंठा अनाड, मुकपाट, बाळापूर, पिंपळदरी, सराटी, बोदवड, वसई, पानस, डिग्रस गोळेगाव, उडणगांव, अंभई, नानेगांव, हट्टी, बवली, हळदा, डकला, शिवणा अमसरी वाघेरा आदी ग्रामिण शेत शिवारातील सगळी कामे आटोपली आहेत. मात्र, अद्याप पेरणीयोग्य पावसाचे आगमन होत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. मृग नक्षत्र लागला तरी अद्यापही पावसाला सुरवात झाली नाही. मान्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याकडे बळीराजासह सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले आहे.
हेदेखील वाचा : Monsoon Alert: मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तासांत पाऊस घालणार थैमान; IMD चा अलर्ट काय?
दरम्यान, काही भागात पावसाच्या सरी कोसळत असल्याने जमिनीत ओलावा आहे. शेतकरी पेरणी करत असले तरी दमदार पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सध्या तरी शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. काही शेतकऱ्यांनी विहिरीतील मुबलक पाण्यावर खरीप हंगामाच्या पिकाच्या पेरणीस प्रारंभ केला आहे.
मका, कपाशी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल
मका, कपाशी, मिरची लागवड करण्याकडे सध्या शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, अजूनही काही कोरडवाहू शेतकरी निसर्गाच्या दमदार पावसाची प्रतीक्षा करत आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहे.
राज्यभरात मुसळधार पाऊस
मागील काही दिवसांपूर्वी मुंबई, पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस झाला. पण, नंतर पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळाले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मान्सून दाखल झाला. मात्र, मान्सूनची गती अजूनही मंदावलेली असून, राज्यात 12 ते 13 जूनपासून मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
हेदेखील वाचा : Karjat News: पावसाला सुरुवात होत नाही तोच पुलाच्या कामाचे तीनतेरा; उल्हास नदीवरील पूल वाहतूकीसाठी बंद