Tukaram Mundhe News: जर एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर? तुकाराम मुंढेंनी दिले उत्तर
Tukaram Mundhe News: राज्यातील अन्नामध्ये भेसळ करणाऱ्या माफियांविरोधात धडक कारवाईमुळे महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. हॉटेल्स, दूध विक्रेते, पॅकेज्ड फूड उद्योग आणि अन्न व्यवसायाशी संबंधित विविध ठिकाणी सुरू असलेल्या त्यांच्या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये मुंढेंविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या कार्यशैलीची तुलना अनेकांकडून अभिनेते अनिल कपूर यांच्या ‘नायक’ चित्रपटातील भूमिकेशी केली जात आहे.
दरम्यान, न्यूज १८ मराठीच्या डिजिटल पॉडकास्टमध्ये तुकाराम मुंढे यांनी वेगवेगळ्या मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांना, “जर तुम्हाला ‘नायक’ चित्रपटाप्रमाणे एक दिवसासाठी मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली, तर तुम्ही काय कराल?” असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुंढे म्हणाले की, “मी अधूनमधून हिंदी आणि इंग्रजी चित्रपटही पाहतो. मात्र, एखाद्या व्यक्तीने एका दिवसात सर्व काही बदलून टाकावे, ही कल्पना चित्रपटापुरतीच मर्यादित असते. प्रत्यक्ष प्रशासनात बदल घडवण्यासाठी सातत्य, प्रामाणिकपणा आणि मजबूत व्यवस्था आवश्यक असते.”
प्रश्न: तुम्ही, नायक सिनेमा बघितला का? तुम्हाला एक दिवसासाठी मुख्यमंत्रीपद मिळाल्यास आणि सगळे अमर अधिकार दिले तर काय कराल?
या प्रश्नावर बोलताना तुकराम मुंढे म्हणाले की, लोकशाहीत कुणालाही अमर अधिकार नसतात. मी शासकीय कर्मचारी म्हणून नेहमी सांगतो. आपलं काम हे शासकीय कर्मचारी म्हणून समाजाला वरच्या स्तराला नेण्याचं काम आहे. त्यांना मार्गदर्शन करणे आणि ताकद देणे, समाज जेवढा विकसित होईल. तेवढा आपला देश आणि व्यक्ती विकसित होतील. लोक आनंदी राहतील. मला कोणत्याही क्षेत्रात रोल दिला तर प्रत्येक दिवशी आणि पुढचा एक इंच कसा वाढेल आणि ते काम पूर्णपणे पारदर्शकपणे जो गोल आणि जो रोल असेल, ते काम झालं पाहिजे, याकडे माझे लक्ष असेल.
यानंतर तुकाराम मुंढे यांना खासगी आयुष्यातील प्रश्न विचारण्यात आला. लग्न जमलं ठेवलं तेव्हा माहिती होतं का की, तुकाराम मुंढे इतका कडक शिस्तीचा माणूस आहे.
यावर उत्तर देताना मुंढे म्हणाले की, ” आमची वन ऑन वन चर्चा झाली तेव्हाच मी तिला सांगितलं होतं. तेव्हा मी नागपूरला होतो. आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हाच मी स्पष्टपणे सांगितलं होतं. माझा स्वभाव असा आहे आणि मला असं करायचं आहे. लग्नाची बोली करताना मी तिला सांगितलं होतं की, तुझ्या काही वेगळ्या अपेक्षा असतील, खूप मोठ्या गाड्यांमधून फिरायचं, असेल तर आपण पुढे जायला नको. पण तु मला या गोष्टीत साथ देणार असशील तर आपण पुढे जाऊ, नाहीतर इथेच थांबू.”






