शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं (Photo Credit- X)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नर्मदा नदी खोऱ्यातील प्रकल्पांसंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
महायुतीत आणखी एका बड्या पक्षाची भर पडणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातून एनडीएमध्ये किंवा राज्यातील महायुतीत सध्या कोणताही नवीन पक्ष येणार नाही. पक्षाच्या विस्तारासाठी किंवा आगामी निवडणुकांसाठी कोणाचाही पक्ष फोडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. सध्याची महायुती भक्कम असून आगामी काळातही आम्ही सर्व घटक पक्ष एकत्रच पुढे जाणार आहोत.” “शरद पवारांच्या पक्षाचे आमदार किंवा खासदार फोडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी सर्व तर्कवितर्कांना थांबवले आहे.
दुसरीकडे, शरद पवार यांचा पक्ष थेट एनडीएत सहभागी होऊ शकतो किंवा एनडीएला बाहेरून पाठिंबा दिला जाऊ शकतो, अशा चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. “आम्ही एनडीएला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते या दोघांनीही या चर्चा फेटाळून लावल्या असल्या, तरी आगामी काळातील राजकीय समीकरणे काय वळण घेतात, याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाच्या आमदारांची आज ‘मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक; बैठकीत नेमकं काय घडणार?






