SPPU
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ऐतिहासिक इमारतीमध्ये शिव्यांचा भडीमार व अश्लील वाक्यांचा वापर करून रॅप साँग शूट करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अशा गाण्यांसाठी विद्यापीठाने परवानगी दिली होती का? दिली नसेल तर मग ऐतिहासिक इमारतीमध्ये असा शिवीगाळ केलेला व्हिडिओ शूट कसा होतो? असे अनेक प्रश्न विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी उपस्थित करत आहेत. विद्यापीठातील विद्यार्थी महादेव रंगा (Mahadev Ranga) यांनी कुलसचिव यांना जाब विचारला असता या व्हिडिओसंबंधी माहिती नसल्याची कबुली डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. याविषयी अधिक तपास आम्ही घेत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.
रॉक्सन या यूट्यूब चॅनलवर हे सल्तनत नावाचे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. सदर व्हिडिओ ५ मिनिटाचा असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात आणि मुख्य दालनात अंतर्गत भागात चित्रीत करण्यात आला आहे. या गाण्यात अश्लील भाषा वापरताना मद्य, पिस्तुल, तलवार अशा साहित्याचा वापर करण्यात आला असून, विद्यापीठ प्रशासन काय करत होते, असा प्रश्न परिसरातील विद्यार्थी विचारत आहेत. या रॅप गाण्यात शिव्या आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आल्याने विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली आहे. या शुटींगसाठी रीतसर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. रॅप साँगच्या नावाखाली थिल्लर शिव्या, अश्लील वाक्य वापरण्याची चढाओढ लागली आहे. मात्र, हे अत्यंत किळसवाने असून, विद्यापीठाची प्रतिमा धुळीत घालवण्याचे काम अशा पद्धतीने होत आहे.
ऐतिहासिक मुख्य इमारत वापरली जाणे म्हणजे प्रशासन झोपा काढत आहे का असे दिसत आहे, असा सवाल महेश राहणे या विद्यार्थ्याने उपस्थित केला आहे. तसेच या गाण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने परवानगी कशी दिली यामध्ये कोणते अधिकारी सहभागी आहेत याचा खुलासा करावा व प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी आणि प्रशासनाने तत्काळ गाण्यातील कलाकार व निर्माते यांच्यावर पोलिसात तक्रार करावी व असे चुकीचे प्रकार थांबावावे. अशी मागणी विविध विद्यार्थी विद्यार्थी संघटनी केली आहे.