Photo Credit- Team Navrashtra
इंदापूर: भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हर्षवर्धन पाटील आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आज (7 ऑक्टोबर) इंदापूरमध्ये सभा होणार आहे. या सभेत हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असेही सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. दोन दिवसांपूर्वी या सर्व चर्चांना त्यांनी पूर्णविराम देत इंदापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. पण पक्षप्रवेशाची तारीख स्वत: शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ठरवतील, असही त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा: ठरलं तर…! हर्षवर्धन पाटील ‘या’ दिवशी तुतारी हाती घेणार
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी गुरूवारी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानी त्यांची भेट घेतली. जवळपास एक तास चर्चा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र आणि कन्या अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सअपच्या डिपीला तुतारी चिन्ह असलेला फोटो ठेवला. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी आपण पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करू, असं सांगितलं होतं. त्यानंतर आज ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश कऱणार असल्याचे निश्चित झाले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रापदही भूषवले. पण 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. पण महायुतीत ही जागा अजित पवार यांच्याकडे असून त्याठिकाणी दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, ही जागा अजित पवारांच्या वाटेला जाणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला.