मुंबई : मुंबई (Mumbai) येथील परळ (Parel) भागात दुपारी १ च्या सुमारास एका पेट्रोल पंपजवळ (petrol pump) आगीची घटना घडली होती. पेट्रोल पंप पासून काहीच फुटांच्या अंतरावर असलेल्या फुटपाथमधून आगीचे लोट येत होते. या घटनेमुळे काहीकाळ परळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अखेर अग्निशमक दलाच्या मदतीने पेट्रोल पंपाजवळ लागलेली आग वीजवण्यात यश आले आहे.
आगीची माहिती मिळताच दादर फायर स्टेशनच्या दोन अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग नियंत्रणात आली असली तरी आगीचे कारण पूर्णतः स्पष्ट न झाल्यामुळे खबरदारी घेत परिसरातील पेट्रोलपंप सह जवळपासची दुकाने बंद करण्यात आली आहेत. महानगर गॅसचा पाईप लीक झाल्याची शक्यता असल्यामुळे महानगर गॅसचे कर्मचाऱ्यांकडून येथील पाहणी केली जात आहे. आगीची घटना घडल्यावर नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही.