Photo Credit- Social Media बीडच्या परळीत पुन्हा हवेत गोळीबार, तिघांवर गुन्हा दाखल
बीड: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरण तापले आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कालही संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा काढण्यात आला. बीडमध्ये हे सर्व सुरू असतानाच बीडच्या परळीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. परळीमध्ये पुन्हा एकदा हवेत गोळीबार केल्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहे. या प्रकरणी परळी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
परळी तालुक्यात हवेत गोळीबार करतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या प्रकऱणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता परळी ग्रामीण पोलिसांनी आणखी तीन जणांवर गुन्हे दाखल केल्यची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे हवेत गोळीबार करणाऱ्यांनीच त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले होते.
कचऱ्याचे टोपले ठेवल्यावरून झाला वाद; नंतर मोठा राडा, 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
परळीचे माणिक हरिश्चंद्र यांच्याकडे परवानाधारक बंदूक असून त्यांनीच बंदुकीसह फोटो काढून तो सोशल मीडियात अपलोड केला होता. हा फोटो अपलोड करून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच शस्त्रसंबंधी परवान्यातील नियमांचेही उल्लंघन केले. त्यानंतर पोलीस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या तक्रारीवरून माणिक हरिश्चंद्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी 14 सप्टेंबर 2023 रोजी पांगरी कॅम्प येथे परवानाधारक जयप्रकाश उर्फ बाळू रामधन सोनवणेने 12 बंदुकीतून हवेत गोळीबार करत त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर सोनावणेविरोधात परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याशिवाय कुणाल श्रीकांत यानेही बंदुकीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. पण कुणालकडे बंदुकीचा परवाना नसतानाही त्याने फोटो अपलोड केले होते. आता यासर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, ज्या ज्या नेत्यांची आणि धनदांडग्यांची बंदुकी-पिस्तुले दाखवीत छायाचित्रे आहेत त्या सर्वांचे शस्त्र परवांनेही रद्द करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा चौकशी सीआयडकडून करण्यात येत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून बीडमधील काही तरूणांचे हातात बंदुका घेतानाचे आणि बंदुकीतून गोळी झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. यावर सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत आहे. अखेर फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांना आदेश दिले आहेत.
बीडमधील काही नेते आणि तरुणांचे बंदुकीतून गोळी झाडतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे बंदुकीसह ज्यांचे- ज्यांचे फोटो व्हायरल होत आहेत, त्या सर्वांचे शस्त्र परवाने रद्द करून त्यांची शस्त्रे ताब्यात घेण्यात यावीत. ही प्रक्रिया तातडीने सुरू करा. तसेच आतापर्यंत ज्यांना ज्यांना बंदुकीचे परवाने दिलेत त्यांचाही फेर आढावा घेण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.