सौजन्य- फ्री पिक
मुंबई, दि. 1 : राज्यात सध्या एक फिरती अन्न नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू असून त्या धर्तीवर लवकरच पाच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधान परिषदेत सांगितले. मालाड येथे ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर सदस्य विलास पोतनीस यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर धर्मरावबाबा आत्राम यांनी फिरत्या अन्न नमुना तपासणी प्रयोगशाळा वाढविणार असल्याचे सांगितले.
धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, जमा केलेल्या अन्न नमुन्यांची तपासणी करण्यासाठी मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर येथे सध्या तीन प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळा वाढविण्याचा प्रयत्न आहे. जमा केलेल्या अन्न नमुन्यांची तपासणी तातडीने करण्यासाठी पीपीपी तत्वावर तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा देखील प्रयत्न आहे. त्यामुळे अन्न तपासणी ही गतीने करता येऊ शकते.
अन्न सुरक्षा अहवालाचा नियमित आढावा आणि ईट राईट उपक्रम
मंत्री आत्राम यांनी यासंबंधी माहिती अधिक माहिती देताना सांगितले की, अन्न सुरक्षेबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नियमित आढावा घेण्यात येतो. भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलीस विभागामार्फत संयुक्तपणे कारवाई केली जाते असे सांगून राज्यात अन्न सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी ईट राईट उपक्रम राबविला जात आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी आणि निरीक्षकांची होणार भरती
राज्यात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या 350 पैकी 210 जागा रिक्त आहेत. लोकसेवा आयोगामार्फत 192 जागांसाठी परीक्षा प्रक्रिया झाली असून मुलाखतीनंतर लवकरच त्यांच्या नेमणुका करण्यात येतील. औषध निरीक्षकांच्या 81 जागांसाठी सुद्धा आयोगाकडे मागणी करण्यात आली असल्याचे मंत्री आत्राम यांनी विधिमंडळात सांगितले.
ईट राईट उपक्रम काय आहे?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) द्वारे 10 जुलै 2018 रोजी इट राइट इंडिया (ERI) हा उपक्रम सुरू करण्यात आला.
सर्वांसाठी सुरक्षित, निरोगी आणि शाश्वत अन्न सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन करून सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि आजारांशी लढा देणे हे ईट राईटचे ध्येय आहे.






