नांदेड : कोणतंही राजकीय पद (Political Post) मिळालं की त्या व्यक्तीची परिस्थितीच वेगळी असते, असा अनुभव अनेकांचा आहे. त्यातून संपत्तीची वाढ होणं ही स्वाभाविक बाब आहे. मग ते अगदी गावाचा सरपंच (Sarpanch) असो की आमदार, खासदार किंवा मंत्री आपल्या फायद्याचे काही केल्याचे अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक सरपंच अपवाद आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक महिला दहेली तांडाच्या सरपंच आहेत. त्यांच्या घरातच गेल्या 25 वर्षांपासून सरपंचपद आहे. तरीदेखील त्यांच्या घरातील परिस्थिती हलाकीची आहे. सरपंचपद असूनही कुटुंबातील सदस्य आजही सालगडी आणि मोलमजुरीचं काम करत आहेत. सरपंचपदातून त्यांनी कवडीची कमाई केली नाही. त्यांना सरपंचपदाचा गर्वही नाही. मिळेल ते काम करुन कुटुंबीय उदरनिर्वाह करत जनतेची सेवा करत आहे. त्यांचे हे कार्य आदर्शवत असे आहे.
दहेली तांडा येथील कुटुंबात रामदास तोडसाम आणि पार्वतीबाई तोडसाम हे राहतात. त्यांना दोन मुलं आणि सुना नातवंड आहेत. 25 वर्षांपूर्वी रामदास तोडसाम आणि त्यांचे कुटुंबीय रोजगाराच्या शोधात दहेली तांडा येथे आले होते.
गावातील मोहन जाधव यांच्याकडे सालगडी म्हणून कामाला आहेत. आजही संपूर्ण कुटुंब सालगडी म्हणून काम करत आहे. त्यांच्या कुटुंबाकडे सरपंचपद आहे. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोह किंवा गर्व नाही. तसेच त्यांनी सरपंचपदातून आपल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी कोणताही फायदा करून घेतला नाही.