किरीट सोमय्यांची ठाकरेंवर टीका (फोटो- सोशल मीडिया)
मुंबईच्या निवडणुकीत नील सोमय्या विजयी
मुंबईत महायुतीची विजयाकडे वाटचाल
किरीट सोमय्यांची ठाकरेंवर टीका
Maharashtra Politics: राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. जवळपास 29 पैकी 25 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान राज्यातील पुणे, मुंबई या महापालिकेच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या समजल्या जात होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नील सोमय्या विजयी झाले आहेत. त्यानंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
अवघ्या राज्याचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर लागलेले होते. ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिवसेना युती अशी मुख्य लढत पाहायला मिळाली. दरम्यान सध्याच्या आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या भाजप आणि शिवसेना युती 120 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर ठाकरे बंधू 70 जागांवर आघाडीवर आहेत. तसेच कॉँग्रेस 21 तर इतर 11 जागांवर पुढे आहेत.
मुमईच्या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या देखील विजयी झाले आहेत. मुलुंड प्रभाग 107 मधून नील सोमय्या हे विजयी झाले आहेत. तब्बल 14 हजार मतांनी नील सोमय्या विजयी झाले आहेत. त्यानंतर माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
किरीट सोमय्या यांनी पुत्र नील सोमय्या यांच्या मुंबई महापालिकेच्या विजयावर भाष्य केले आहे. माझ्या मुलाने ठाकरेंची इज्जत काढली असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी ठाकरेंवर केली आहे. त्यामुळे नील सोमय्या यांच्या विजयानंतर किरीट सोमय्या यांनी ठाकरेना डिवचले असल्याचे समोर येत आहे.
दक्षिण मुंबईत लोढांचा ‘मलबार हिल’ गड अभेद्य
राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या मलबार हिल विधानसभेत येणाऱ्या पाचच्या पाच वॉर्डमध्ये कमळ फुलवण्यात मंत्री लोढा यशस्वी झाले असून कार्यकर्त्यांनी मतदार संघातल्या विविध भागात जल्लोष केला. आतापर्यंत जनतेच्या केलेल्या सेवेचीच ही पावती असल्याची प्रतिक्रिया मंत्री लोढा यांनी दिली आहे.
मलबार हिल विधानसभेच्या वॉर्ड क्र. 214 मधून भाजपचे अजय पाटील यांनी मनसेच्या श्री. मुकेश भालेराव यांचा तब्बल 8371 मतांनी पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक 215 मधून भाजपाचे संतोष ढाले यांनी उबाठाचे किरण बाळसराफ यांचा 2811 मतांनी पराभव केला. ताडदेव परिसरातील वॉर्ड क्रमांक 217 मधून भाजपाचे उमेदवार गौरांग झवेरी यांनी मनसेचे उमेदवार श्री. निलेश शिरधनकर यांच्यावर 8857 मतांनी दणदणीत विजय मिळवला.






