वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर किशोर पाटकरांचा संताप (Photo Credit- X)
नवी मुंबई: सोमवारी वाशी येथे झालेल्या खाटीक समाजाच्या मेळाव्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या कार्यक्रमात बोलताना मंत्री नाईक यांनी सांगितले की,“मी देखील बिबट्याची पिल्ले आणि हरणाची पिल्ले पाळली होती. परंतु वनमंत्री झाल्यावर ही बाब कायदेशीर नाही म्हणून मी त्यांना सोडून दिले.”
या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
विशेषतः बेलापूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत मंत्री नाईक यांच्या जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पत्रकारांना सांगितले की, एखाद्या जबाबदार व्यक्तीने बिबट्याची पिल्ले आणि हरण पाळणे हे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे. जर त्यांना ही पिल्ले सापडली होती, तर त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना किंवा वनविभागाला देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे न करता स्वतःकडे ती ठेवून त्यांचे पालन-पोषण केले, ही बाब गंभीर आहे. त्यांना ही पिल्ले कुणी आणून दिली होती, आणि सध्या ती कुठे आहेत, याचा तपास होणे अत्यावश्यक आहे. कारण हे प्रकरण वन्यजीवांच्या बेकायदेशीर संगोपनाशी निगडित गंभीर बाब आहे.”
Navi Mumbai News: “पालकमंत्री असताना सुधारणा का केली नाही?”, मंदा म्हात्रेंची गणेश नाईकांवर टीका
“वनमंत्री झाल्यावर मी त्यांना सोडून दिले. यावर शिंदे गट शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर म्हणाले की, जर गणेश नाईक म्हणाले की, वनमंत्री झाल्यावर मी ती पिल्ले सोडून टाकली. तर याच दुसरा अर्थ असा होतो की, गणेश नाईक वनमंत्री झाले नसते तर त्यांनी ती पिल्ले स्वतःकडे ठेवली असती. असा दुसरा अर्थ त्यांच्या वक्तव्याचा होत आहे. जंगली प्राणी पाळणे अथवा आपल्याकडे ठेवणे हा गुन्हा आहे हे इतकी वर्ष शासनात वावरणाऱ्या मंत्र्याला माहीत नसणे याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे त्यांचे वक्तव्य करणे म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस आहे. मंत्री म्हणून ते कायद्याचे पालन करणारे असले तरी त्यांच्या अशा कबुलीजबाबाने चुकीचा संदेश जातो. या प्रकरणात मी वेळ पडल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे असे पाटकर म्हणाले. दरम्यान, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार बिबट्या, हरिण यांसारख्या प्राण्यांना पाळण्याच्या गुन्ह्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाची तरतूद आहे.
Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..