फोटो सौजन्य - pinterest
नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमधील नदी नाले आणि धरणे तुडूंब भरून वाहत आहेत. नाशिकचं गंगापूर धरण 80 टक्के भरलं आहे. त्यामुळे नाशिकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. नाशिककरांना पाण्यासाठी गंगापूर धरणावर अवलंबून राहावं लागतं. उन्हाळ्यात गंगापूर धरण आटल्याने नाशिककरांसमोर पाणीप्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता अखेर गंगापूर धरण भरल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज गंगापूर धरणातून पहिला विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरणातून आज दुपारी 12 वाजता एकूण 500 क्युसेकने विसर्ग करण्यात आला.
हेदेखील वाचा- मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम, शिकविण्याची गरज नाही; विखेंचा थोरातांना टोला
गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरीमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. सततच्या पावसामुळे नाशिकमधील धरणाच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नाशिकच्या गंगापूर, दारणा, नांदूरमध्यमेश्वर, कडवातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज गंगापूर धरणातून पहिला विसर्ग करण्यात आला. सततच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ होत असल्याने शासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
हेदेखील वाचा- उरण हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार – रूपाली चाकणकर
नाशिकच्या गंगापूर धरणाच्या ज्या गेटमधून विसर्ग होणार आहे, त्या गेटच्या देखभाल दुरुस्तीचं काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आलं आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी 12 वाजता एकूण 500 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. तर दुपारी 3 वाजता एकूण 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. पावासाचा वाढता जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नाशिकमधील वाढत्या पावसामुळे गोदावरी नदी देखील तुडूंब भरली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीच्या कडेला असलेल्या चांदोरी, सायखेडा, करंजवन गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील धरण आणि बंधारांतून देखील विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विसर्ग करण्यात येणार पाणी जायकवाडी धरणात जाणार आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असला तरी मराठवाडा मात्र कोरडा आहे. मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणं देखील पूर्ण भरली नाही. मराठवाड्यातील एकूण धरणसाठा हा 19.91 टक्क्यांवर आहे. त्यामुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या धरण आणि बंधाऱ्यातून विसर्ग करण्यात येणार पाणी मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात जाणार आहे. त्यामुळे आता जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरण हे सर्वाधिक क्षमता असलेले धरण आहे. पाऊस लांबल्याने ह्या धरणातील पाणीसाठा 4 ते 5 टक्क्यांवर गेला होता. मात्र आता हा पाणीसाठा 10.35 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.