घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण (Photo Credit- X)
ठाणे/स्नेहा जाधव काकडे: घोडबंदर येथे वाहतुक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असताना मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा नागलाबंदर भागात नागरिकांनी एकत्र जमून आंदोलन केले. आंदोलकांनी काहीवेळासाठी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. जो पर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
घोडबंदर हा मार्ग उरण जेएनपीए बंदरातून वाहतुक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा आहे. तसेच मिरा भाईंदर, वसई, विरार, पालघर भागातून ठाणे, नवी मुंबईत कामानिमित्ताने वाहतुक करणाऱ्या नोकरदारांसाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे. घोडबंदर मार्गालगत लोकवस्ती देखील वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीचा भार घोडबंदर मार्गावर आला आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाधीन कामे सुरु असल्याने कोंडीत भर पडते.
वाहतुक कोंडीविषयी अनेक तक्रारी करुनही प्रशासनाकडून येथील कोंडी आणि खड्ड्यांची समस्या सोडविली जात नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी सकाळी आंदोलन केले होते. मंगळवारी पुन्हा एकदा घोडबंदरमधील काही रहिवाशांनी एकत्र येऊन घोडबंदर येथील नागलाबंदर परिसरात आंदोलन केले. येथील वाहतुक पोलिसांच्या चौकीजवळ आंदोलन करण्यात आले.
काही आंदोलकांनी रस्तामध्ये येऊन काहीवेळासाठी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा आंदोलक एका बाजूला उभे राहिले. प्रशासनापर्यंत नागरिकांचा आवाज पोहचविण्यासाठी हे आंदोलन केल्याचे आंदोलकांनी सांगितले. खड्डे, वाहतुक कोंडीची समस्या यासाठी हे आंदोलन सुरु आहे.
घोडबंदर भागात वारंवार होणारी वाहतुक कोंडी, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. यावर काहीतरी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. घोडबंदर घाट रस्त्यावरुन अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होत असते. घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे आणि विरुद्ध दिशेने सुरु असलेली वाहतुक याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो.
दररोज गायमुख घाट परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे ठाण्याहून वसई, विरार, गुजरात, मिरा भाईंदरच्या दिशेने वाहतुक करताना आणि तेथून या ठाणे, नवी मुंबईत जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसत असतो. या वाहतुक कोंडीत अवजड वाहने देखील अडकत असतात. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. सकाळी हजारो नोकरदारांकडून या मार्गाचा वापर होतो. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही.