'वंदे मातरम्' गीताला १५० वर्ष पूर्ण (फोटो- सोशल मीडिया)
यंदा वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्ध शताब्दी महोत्सवाला सुरुवात
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभरात विविध कार्यक्रम
मुंबई: स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त राष्ट्रभक्तीच्या भावनेतून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता ‘वंदे मातरम् ‘ चे समुहगान होणार आहे. पुढील वर्षभर याअंतर्गत ‘ सार्ध शताब्दी महोत्सवाच्या माध्यमाने राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती ही राज्याचे कौशल्य, विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात मंत्री लोढा म्हणाले की, वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना अभिवादन आणि मातृभूमीला वंदन करणारे संस्कार या गीताच्या समूह गायनातून होणार असल्याने शासकीय स्तरावरून ही शैक्षणिक संस्था आणि सरकारी आस्थापनांमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताचे समूहगान आयोजित करण्याबाबत शासकीय परिपत्रक आणि अध्यादेश जारी करण्यात आले असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
‘वंदे मातरम’ला विरोध अन् Mangal Prabhat Lodha अबू आझमींविरुद्ध आक्रमक; दिले थेट ‘हे’ आव्हान
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागानेही राज्यस्तरीय तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. राज्यभरात निबंध लेखन, परिसंवाद, प्रदर्शने आणि वक्तृत्व स्पर्धा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या विभागाच्या वतीनेही राज्यभरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
विविध सामाजिक संघटना, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच समाज माध्यमांवर या ऐतिहासिक सोहळ्याला व्यापक रूप देण्याचा कौशल्य आणि सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे. देशभक्ती जागृत करणाऱ्या सार्ध शताब्दी महोत्सवात सर्वानी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा,असे आवाहन मंत्री लोढा यांनी जनतेला केले आहे.






