मलाही मारहाण, आज मी जिवंत आहे ते केवळ माझ्या...; हगवणेंच्या मोठ्या सूनेचाही हादरवून टाकणारा दावा
Vaishnavi Hagawane Death : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सासरे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असल्यामुळे प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. अजित पवार यांनी असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको असं ठणकावून सांगत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबियांचे दररोज नवीन कारनामे समोर येत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना हगवणे यांच्या मोठ्या सूनेनेही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे.
वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत.
पती घरी नसताना सासू, सासरा, दीर,आणि नणंदेकडून बेदम मारहाण केली जात होती. आज मी जिवंत आहे ती केवळ माझ्या पतीमुळे. योग्यवेळी त्यांनी माहेरी आणून सोडल्याने मी जिवंत राहिले. ती माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात, याची जाणिव माझ्या पतीला होती. या चौघांकडून वैष्णवीलाही सुद्धा त्रास दिला जात होता. शशांकला सासरच्यांकडून महागड्या वस्तू हव्या होत्या. सासूने तर वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचं आपण स्वत: ऐकल्याचा दावा देखील मयुरी जगताप यांनी केला आहे.
विशेष म्हणजे वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांच्याही लग्नाला वैष्णवीच्या घरातल्यांचा विरोध होता. तरही घरच्यांचा विरोध पत्करुन वैष्णवीने लग्नाचा निर्णय घेतला. घरच्यांनी राग सोडून तिचं थाटात लग्न करुन दिलं होतं. मात्र लग्नानंतर शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. २०२३ मध्ये मुलगी वैष्णवी गरोदर असताना शशांकने तिच्यावर संशय घेतल्याचं म्हटलं होतं, वैष्णवीच्या वडिलांनी त्यानंतर पोलीस तक्रारही केली होती. समाज इतका प्रगत झाला. मुलं मुली स्वत:च्या आयुष्याचा स्वत: निर्णय घेऊ लागलेत. तरी हुंड्यासारखी कुप्रथा आजही आपल्या समाजात आहे ही शोकांतिका आहे. त्यातून जाणारे बळी अद्यापही थांबताना दिसत नाही, ही बाब खरोखरच चिंताजनक आहे.