पुणे : येरवडा कारागृहातील कैदी टाळमृदुंगाचा गजर करत कीर्तनात रमल्याचे मनमोहक चित्र पाहिला मिळाले. अत्यंत प्रसन्न अशा या वातावरणाने कारागृहाचा परिसर भक्तीच्या रसाने नाहून निघाला होता. राज्य कारागृह विभागाकडून येरवडा कारागृह विभागाने कैद्यांसाठी शनिवारी कीर्तन सोहळा आयोजित केला होता. यावेळी कैद्यांनी कीर्तन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
येरवडा कारागृहात तीन हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत. कैद्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. चार भिंती आड असणाऱ्या कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रम राबविले जातात. वारकरी आचारसंहिता परिषदेचे निलेश महाराज झरेगावकर यांच्या संकल्पनेतून स्वामी गोविंदगिरी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोविंददेव गिरी, सुनील देवधर उपस्थित होते. यावेळी कैद्यांनी पसायदान सादर केले.
तसेच विविध अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष महानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक सुनील ढमाळ, अनिल खामकर, डाॅ. भाईदास ढोले, पी. पी. कदम, एम. एच. जगताप, मंजिरी कुलकर्णी, आनंदा कांदे यांनी कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.