भात पिकाला वादळी पावसाचा मोठा धोका
कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील दोनवडे ते बालिंगे हे अंतर म्हणजे नुसता धुरळाच आहे. नुकताच मान्सून संपला आहे. वादळी पाऊस सुरू आहे. आता थोड्याशा वादळी पावसाने ही माती बसेल. पण पुन्हा धुरळाच पाहायला मिळणार आहे. अमावास्येच्या तोंडावर पाऊस लागेल, अशी शक्यता होती. पण आता वादळी पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. भात पिके कापणी व ऊस गळीत हंगाम सुरू होणार आहे. या वादळी पावसामुळे हे सगळीच कामे थांबणार आहेत.
ऐन हंगामात वळवाच्या पावसामुळे भात मळणी करणे म्हणजे मुश्किल आहे. ऊस कसाही आटापिटा करून बाहेर आणू शकतो. पण भात मळणी करणे म्हणजे त्याचे जिवाचं रान होतं. आणि हाता-तोंडाशी आलेली पिकं या वादळी पावसामुळे जातील, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गेली चार महिने जीवापाड प्रेम केलेले आणि हाता-तोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत जाणं हे कुठल्याही शेतकऱ्याला बघवत नाही आणि पावसाळ्यात भिजत कित्येक काबाडकष्ट करून आणलेलं पीक कुजून जाईल, अशी भीती आहे.
दरम्यान, आता वादळी पावसाने सुरुवात केली आहे. पण या वादळी पावसामुळे आलेली पिके राहतील का? हा पण मोठा प्रश्न आहे. भात पिकाला या वादळी पावसाचा मोठा धोका बसला आहे.
मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
दुसरीकडे, मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. या झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत. शेतकऱ्यांच्या फळबागा सुद्धा या जोरदार पावसामुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे आडव्या झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतामधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची सरकारकडे मागणी केली आहे.






