पुणे : कसबा (Kasba Peth Bypoll) विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला. या पराभवानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली. यामध्ये कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा 11 हजार 040 मतांनी विजय झाला तर हेमंत रासनेंना 61,771 मते मिळाली आहेत. धंगेकर यांना एकूण ७२ हजार ५१९ मते मिळाली आहेत, तर हेमंत रासने यांना ६१७७१ एकूण मते मिळाली आहेत. या पराभवानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कसबा मतदारसंघात आम्ही मतदारापर्यंत गेलो. जनतेने कौल दिला नाहीतर आम्ही आत्मपरिक्षण करु. आम्ही चिंचवडमध्येही तशीच निवडणूक लढली आहे. चिंचवडमध्ये आम्ही पुढे आहोत. यामुळे आम्ही कसबा मतदारसंघात आत्मपरिक्षण करु’.
आम्ही दिलेले उमेदवार उत्तम
‘कसबा पेठ मतदारसंघात आम्ही दिलेले हेमंत रासने हे उत्तम उमेदवार आहेत. त्यांनी महापालिकेत चांगले काम केले आहे. या मतदारसंघातील सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून उमेदवारी देतो. पण, शेवटी जनता ठरवत असते’, चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.