पुणे : कसबा (Kasba) विधानसभा पोटनिवडणुकीचा (Election) प्रचाराला जोर चढला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. आपला मतदारसंघ राखण्यासाठी भाजपाकडून (Bjp) विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपाने गिरीश बापटांना (Girish Bapat) प्रचार रिंगणात उतरवले आहे. काल झालेल्या प्रचारात गिरीश बापट नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून सहभागी झाले होते. बापटांना बोलतानाही त्रास होत असल्याचे दिसून आले होते. बापट यांची ही अवस्था बघून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आनंद दवे नेमकं काय म्हणाले ?
काल गिरीश बापट यांना प्रचार करताना पाहिले. ते ऑक्सिजन लावून प्रचारासाठी आले होते. त्यांना पाहून मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आठवले. त्रास बापट साहेबांना होत होता… पण यातना आम्हाला जाणवत होत्या. त्यामुळे आज मी व्यक्तिशः प्रचार करणार नाही. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे याचा मानसिक त्रास आम्हाला होत असल्यामुळे मी आज व्यक्तिशः प्रचार करणार नसल्याचं ठरवलं आहे, असं आनंद दवे म्हणाले.
दरम्यान, काल गिरीश बापट कसब्यात प्रचारासाठी आले होते. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारसभेत बापट यांनी भाग घेतला. यावेळी बापट यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी होती. हाताला ऑक्सिमीटर लावले होते. त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत होती. तरीही बापट प्रचारासाठी आले होते.