Photo : Shashikant Shinde
पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघातील पालकमंत्री असतानाही येथील मतदारांनी मला लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) चांगले मताधिक्य दिले, याचा मला अभिमान आहे. साधा कार्यकर्ता काय इतिहास घडवू शकतो, ते पाटण तालुक्याने दाखवून दिले आहे. तालुक्यातील लोकहिताच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची आपली तयारी आहे. मी पराभवाला घाबरत नाही. तुतारी वाजली नाही, अशी टीका झाली. पण आता न निवडून येता तुतारी कशी वाजते ते सातारा जिल्ह्याला दाखवून देऊ,’ असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील, डॉ. भारत पाटणकर, सुनील माने, निवासराव पाटील यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
शशिकांत शिंदे म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा अबाधित राहिला पाहिजे, यासाठी आपण लढलो. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. मी सर्वसामान्य जनतेला घेऊन निवडणूक लढलो. 38 हजार मते कमी मिळाली, याचा फटका आपल्याला बसला. पुढे विधानसभेची निवडणूक आहे. शून्यातून पार्टी उभी करायची आहे, असे समजून काम करा.
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, विरोधकांनी विविध आयुधे वापरून निवडणूक लढवली. पाटण तालुक्यात थोडे यश मिळाले. यात कमी का पडलो? याचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. तालुक्यात ज्यांनी धरणांची कामे जाणीवपूर्वक बंद पाडली ते आता धरणांची कामे चांगली करा, असा आदेश देत आहेत. तो एक विनोदच आहे. पराभवाची कारणे शोधा. हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे, असे समजून वाटचाल करा.