संग्रहित फोटो
संभाजीनगर : जून महिन्याचे अकरा दिवस लोटले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागात पाऊस आगमनाचे (Rainy Season) कोठेही चिन्ह नसल्याने नागरिकांचे ‘टेन्शन’ वाढीस लागले आहे. पाऊस (Rain in Maharashtra) उशिरा येण्याचे संकेत प्राप्त झाले असले तरी पेरण्यांचे समीकरण मात्र बिघडले आहे. पण आता बळीराजाचे टेन्शन लवकरच संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मॉन्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने येतो आहे. त्यातच चक्रीवादळही मुंबई किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी, पुढील पाच दिवस अकोला जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यताही नागपूर वेधशाळेने (हवामान खाते) वर्तविली आहे. मृगनक्षत्राला सुरुवात होऊनही मॉन्सूनचा पत्ता नाही. कधी येणार याबाबत दररोज नवे अंदाज येत असतानाच तापमानात वाढ होताना दिसत आहे.
काय आहे हवामानाचा अंदाज?
नागपूर वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात वेगाने वारे वाहतील. सोबतच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामानाच्या अंदाजात वर्तविण्यात आली आहे.