अपक्ष आमदार शरद सोनवणे शिवसेनेत करणार प्रवेश
नारायणगाव: किल्ले शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे अपक्ष आमदार शरद सोनवणे, नारायणगावचे माजी लोकनियुक्त सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे कार्यकर्त्यांसह तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील जबाबदार पदाधिकारी असे सुमारे ४०० कार्यकर्ते शिवसेनेचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे. अशी माहिती जुन्नर चे अपक्ष आमदार शरद सोनवणे, उपसरपंच योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे यांनी नारायणगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (दि.२८) शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून दुपारी चार वाजता त्यांचे जुन्नर येथे आगमन होणार आहे. त्यानंतर गोद्रे (ता.जुन्नर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे काम चालू आहे. त्या ठिकाणी शिंदे भेट देणार असून इंजिनीयर, डिझायनर व ठेकेदार यांच्याकडून पुतळ्यासंबंधी माहिती घेणार आहे.
सायंकाळी ६ वाजता नारायणगाव येथील पूर्व वेशी जवळ आयोजित केलेल्या महामेळाव्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार असून त्यांच्या उपस्थितीत जुन्नर चे विद्यमान अपक्ष आमदार शरद सोनवणे, उपसरपंच बाबूभाऊ पाटे, अन्य पक्षातील पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.