संग्रहित फोटो
सोलापूर : सोलापूर शहर कार्यकारिणी निवडीच्या निमित्ताने सोलापूर भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ज्येष्ठ नेत्या रोहिणी तडवळकर यांची पक्षाने ४ महिन्यापूर्वी मे महिन्यात शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. परंतु आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांना ती मान्य नव्हती. तडवळकर यांच्या पदभार स्वीकृती कार्यक्रमासही दोन्ही आमदार उपस्थित राहिले नव्हते. याच अंतर्गत वादामुळे सुमारे चार महिने कार्यकारिणीची निवड लांबणीवर पडली होती. बुधवारी (दि. १० सप्टेंबर) अखेर तडवळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर केली. मात्र त्यात जुन्या निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आलेल्यांनाच संधी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे दुपारी बाराच्या सुमारास शहराध्यक्षांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली व नूतन उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी तासाभरातच आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. जाधव हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आहेत. देशमुखांच्या नेतृत्वात पक्षकार्य करत राहू, असे त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
जाधवांना दुय्यम पद, आमदार पूत्राचेही नाव कापले
अनंत जाधव जुने कार्यकर्ते आहेत. ते शहर अध्यक्षपदाच्या स्पर्धेत होते. परंतु पक्षाने दोन्ही आमदार देशमुख समर्थकांना बाजूला सारून तडवळकर यांना निवडले. त्यामुळे जाधव नाराज होते. त्यातच आता उपाध्यक्षपदावर बोळवण केलेली त्यांना मान्य नाही. मागच्या कार्यकारिणीत आमदार विजयकुमार देशमुखांचे पूत्र किरण देशमुख यांच्यासह अनेक समर्थकांना डावलले.
इन्कमिंग वाढल्याने निष्ठावंत बाजुला
भाजपत इन्कमिंगचा ओघ वाढल्याने निष्ठावंत बाजुला पडत आहेत. महिला आघाडीच्या अध्यक्षपदासाठी विजया वड्डेपल्ली, इंदिरा कुडक्याल या इच्छुक होत्या. पण पाच वर्षांपूर्वीच आलेल्या रंजिता चाकोते यांना संधी देण्यात आली. काँग्रेसमधून आलेले देवेंद्र भंडारे, वैष्णवी करगुळे यांना कार्यकारिणीत, शिवसेनेतून आलेले संजय साळुंखे यांना थेट सरचिटणीसपदाचे बक्षीस देण्यात आले.
बुद्धिजीवी सेलसाठी प्रमुख सापडेना
नव्या कार्यकारिणीत नऊ उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस व १२ चिटणीस व ५४ सदस्यांचा समावेश आहे. कोषाध्यक्ष, कार्यालय प्रमुख, प्रसिद्धी प्रमुख पदासाठी प्रत्येकी एक नाव आहे. भाजयुमोसह पक्षाच्या इतर मोर्चाचे ५ अध्यक्ष जाहीर करण्यात आले. मात्र किसान मोर्चाच्या अध्यक्षपदासाठी पक्षाला अजून उमेदवार सापडलेला नाही. विविध आघाडी व सेलचे २० प्रमुख (संयोजक) जाहीर झाले. यातही दक्षिण भारतीय सेल, दिव्यांग सेल व बुद्धिजीवी सेलच्या प्रमुखपदी माणूस सापडलेला नाही. कार्यकारिणीत सात पदे रिक्त ठेवण्यात आली.
कार्यकारिणीत ७ पदांच्या समोरील नावे रिक्त ठेवली आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर तडवळकर म्हणाल्या, अजून आमदारांचा निरोप यायचा आहे. प्रदेश कार्यालयाच्या मंजुरीनेच यादी जाहीर केली. अनंत जाधव यांचा राजीनाम्याबाबत प्रदेश कार्यालयास कळवू.
-रोहिणी तडवळकर, शहराध्यक्षा