मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यानंतर मात्र विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे वित्तीय तूट वाढली आहे. लवकरच राज्याच्या डोक्यावरील कर्ज 1 लाख कोटी रुपये होणार आहे. हे कर्ज कसे फेडणार, असे अनेक गंभीर सवाल शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केले.
जयंत पाटील यांनी विधीमंडळामध्ये बोलताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, “अंतरिम अर्थसंकल्प हा गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा 1 लाख कोटी रुपयांपेक्षा वाढीव रकमेचा होता. राज्य सरकारने मागचा अर्थसंकल्प हा 17 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा मांडला. तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर जून महिन्यात या अर्थसंकल्पात पुरवणी मागण्यांची 44 हजार कोटींची भर घातली. त्यानंतर डिसेंबर महिन्यातही 55 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर आता काल-परवा 8 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या. अर्थसंकल्प मांडताना तो तुटीचा होता. तरीदेखील राज्य सरकारने 1 लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या,” ही बाब प्रकाशझोतात आणून देत जयंत पाटील यांनी राज्य सरकारला जाब विचारला.
तसेच जयंत पाटील पुढे म्हणाले, “आम्ही सत्तेत असताना अजित पवारांनी 2022 सालचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर टीका केली. आता 40 आमदार सत्तेत सामील झाले आहेत. सत्तते येताना या आमदारांनी काही अटी टाकल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरवणी मागण्यांचं शेपूट वाढत गेलं. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठीची तरतूद या नव्या अर्थसंकल्पात आहे का? 94 हजार कोटींची वित्तीय तूट 99 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वित्तीय तूट ही 99 हजार 288 कोटी रुपये आहे. म्हणजे ही तूट एक लाख कोटींच्या वरच आहे. थोडी तडजोड करून दुरूस्ती केलेली दिसत आहे. आपण बाटाच्या दुकानात गेल्यावर बुटाची किंमत ही 999 रुपयांच्या स्वरुपात असते. मला दुकानात गेल्यावर प्रश्न पडतो की हा बूट 990 रुपयांना का नाही. तो 999 रुपयांनाच का असतो. लोकांना वाटतं की तो बुट 1000 रुपयांना नाही, तो 999 रुपयांना आहे, तोच घेऊया. अगदी तशाच पद्धतीने वित्तीय तुटीचा आकडा दाखवण्यात आला,” अशी स्पष्ट भूमिका शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मांडली.