बीड : शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी लोकसभा निवडणूक लढणार अशी भूमिका त्यांनी मुंबईतून जाहीर केली होती. बीड लोकसभा मतदाससंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या. मात्र आता त्यांनी माघार घेतल्याचे स्वत: म्हटले आहे.
मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केला, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक लढवावी असा जनतेचाच होरा होता. त्यामुळे मी त्या दृष्टीने चाचपणी केली तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून, पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान ज्योती मेटे कोणाला पाठिंबा देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांनी संपर्क केल्याची चर्चा होती. तर ज्योती मेटे यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे त्या कोणाला पाठिंबा देणार हे ही महत्त्वाचं आहे.