कल्याण : कल्याणमध्ये एक अल्पवयीन तरुण उपचारा अभावी तब्बल आठ तास रुग्णवाहिकेत फिरत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखेरीस शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने या १७ वर्षीय कमल चौहान याला रुग्णालय नशीबाला आले. एक रुग्णालयाने बिल भरत नसल्याने त्याला सरकारी रुग्णलायात पाठविले. त्याठिकाणी बेड उपलब्ध नव्हता. त्याला तिसऱ्या ठिकाणी आणले त्याठिकाणी उपचाराला नकार मिळाला. या रुग्णालयांच्या विरोधात काही कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नेवाळी परिसरात राहणारा कमल चौहान हा १७ वर्षीय तरुण देवीच्या विसर्जनासाठी गेला होता. तो पाण्यात बुुडू लागला. त्याला नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी धनेश म्हात्रे यांच्या मदतीने कमलला कल्याणच्या जनकल्याण खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रभर त्याच्यावर उपचार सुरु होते. रुग्ण वाचणार असे कुटुंबियांना सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी दुपारी कमलला केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. कमलचा भाऊ करणचा आरोप आहे की, जनकल्याणमध्ये अव्वाच्या सव्वा बिल लावले गेले. इतके पैसे कसे लावले जात आहेत. असा सवाल विचारला. तेव्हा तुमचा रुग्ण उपचारासाठी केईएमला घेऊन जा असे सांगितले आले.
या प्रकरणात जनकल्याणचे डॉ जितेंद्र मिश्रा यांचे म्हणणे आहे की, कमलच्या उपचारा संदर्भात कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. त्याला व्हेटींलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या कुटुंबियांना असा संशय होता की, पेशंट गेला आहे आणि आम्ही उगीच सुरु ठेवत आहे. त्यामुळे आम्ही पुढील उपचार करु शकत नाही असे सांगितले.
या नंतर कमलचे कुटुंबिय त्याला रुग्णवाहिकेत टाकून दुपारी एक वाजता केईएम रुग्णलयात घेऊन गेले. त्याठिकाणी गेल्यावर कमलसाठी बेड उपलब्ध नाही झाला. जवळपास पाच तास कमल रुग्णवाहिकेत पडून होता. त्याला उपचारासाठी उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. त्याठिकाणीही कमलला दाखल करुन घेण्यात आले नाही. त्या रुग्णालयालाही असे वाटले की, रुग्णाचे नातेेवाईक पैसे भरु शकत नाही. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांसोबत धनेश म्हात्रे होते. त्यांनी पैसे भरण्याची तयारी दाखविली. तरी देखील त्याला उपचारासाठी दाखल करुन घेतले नाही. हा प्रकार कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना कळताच त्यांनी आठ तास कमलला घेऊन फिरणाऱ्या रुग्णवाहिकेचे पहिले पैसे भरले. कमलला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. महेश गायकवाड यांच्या मदतीनंतर कमल चव्हाण याच्यावर उपचार सुरु झाले आहेत. मात्र ज्या खाजगी रुग्णालयांनी पैशासाठी कमलच्या जिवाशी खेळ केला. त्यांच्या विरोधात कारवाई होणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.